पणजी, 10 मार्च : देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल (Election Result 2022) आज समोर येत आहे. आतापर्यंत समोर आलेले निकाल आणि कलांनुसार भाजपचा चार राज्यांमध्ये चांगलाच बोलबाला दिसतोय. सध्या पूर्णपणे निकाल समोर आला नसला तरी विजयी उमेदवारांची नावे आता जाहीर होऊ लागली आहेत. या दरम्यान गोव्यातून एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. गोव्यात भाजपचे उमेदवार विश्वजित राणे आणि त्यांच्या पत्नी दिव्या राणे या दोघांचा विजय झाला आहे. त्यामुळे या निवडणुकीत राणे दाम्पत्याचा गोव्यात चांगलाच बोलबाला असल्याचं दिसत आहे. विश्वजित राणे हे तब्बल 8300 मतांनी जिंकून आले आहेत. तर त्यांच्या पत्नी दिव्या या पहिल्यांदाच निवडणुकीच्या रणांगणात उतरल्या होत्या. तरीही त्यांना विजय मिळाला आहे. विश्वजित राणे यांना वाळपई मतदारसंघातून विजय मिळाला आहे. तर त्यांच्या पत्नी दिव्या यांना पर्रेमधून विजय मिळाला आहे. दिव्या ज्या मतदारसंघातून जिंकून आल्या आहेत तो मतदारसंघ खरंतर त्यांचे सासरे प्रतापसिंह राणे यांचा आहे. प्रतापसिंह हे गोव्यातील खूप बडे नेते आहेत. त्यांनी तब्बल 6 वेळा गोव्याचं मुख्यमंत्रीपद भूषविले आहे. ( यूपीत भाजपची सत्ता, पण 60 जागेवर निवडणूक लढणाऱ्या शिवसेनेचं काय झालं? ) प्रतापसिंह काँग्रेसचे, सूनेने उमेदवारी अर्ज दाखल करताच माघार प्रतापसिंह राणे हे खरंतर काँग्रेसचे नेते होते. त्यांनी अनकेवर्ष काँग्रेसमध्ये राहून गोव्यात सरकार चालवलं. त्यांनी सध्याच्या विधानसभा निवडणुकीवेळी देखील पर्रे मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण त्यांच्या सून दिव्या यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज सादर केल्याची माहिती त्यांना मिळाली तेव्हा त्यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. विशेषत: काँग्रेससाठी हा मोठा धक्का होता. प्रतापसिंह हे पर्रेमधून आतापर्यंत 11 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांचा एकाही निवडणुकीत पराभव झालेला नाही. गोव्यात माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाचा पराभव गोव्यात एकीकडे सहावेळा मुख्यमंत्रीपद भूषविलेले ज्येष्ठ नेते प्रतापसिंह राणे यांचा मुलगा विश्वजित राणे आणि सून दिव्या राणे यांचा विजय झाला आहे. पण दुसरीकडे भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर यांचा पराभव झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.