केवळ मनोहर पर्रीकर यांचा मुलगा म्हणून उमेदवारी देता येणार नाही, असं फडणवीस म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याला उत्पल पर्रीकर यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं.
पणजी, 21 जानेवारी : गोव्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचंड राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. विशेष म्हणजे गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर यांनी भाजपच्या विरोधात बंड पुकारलं आहे. त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपण पणजीतून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी भाजपचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांना सडेतोड उत्तर दिलं. केवळ मनोहर पर्रीकर यांचा मुलगा म्हणून उमेदवारी देता येणार नाही, असं फडणवीस म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याला उत्पल पर्रीकर यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं.
"मी दुसरे पर्याय कसे मान्य करु शकतो? मी मनोहर पर्रीकरांचा चिरंजीव म्हणून तिकीट मागणार असतो तर मी गेल्यावेळी देखील मागितलं असतं. तेव्हा पक्षाने जे सांगितलं ते मी ऐकलं. जो उमेदवार त्यांनी दिलाय त्याबद्दल मला बोलायला देखील लाज वाटतेय. आम्ही जिथे 30 वर्ष पक्ष मोठा केलाय त्या पणजीत दोन वर्षांपूर्वी दुसरीकडून कुणी आलेल्याला व्यक्तीला पक्षाने उमेदवारी दिली याचं वाईट वाटतंय. मला काही एक पर्याय राहिलेला नाही. मला आता निर्णय लोकांकडे ठेवायचा आहे. ज्या लोकांनी माझ्या वडिलांना पक्ष वाढवण्यासाठी मदत केली ते माझ्यासोबत आहेत", अशी भूमिका उत्पल पर्रीकर यांनी ठामपणे मांडली.
'माझी तत्वासाठी लढाई'
"माझ्या राजकीय कारकिर्दीबद्दल खूप जणांनी चिंता व्यक्त केलीय. माझ्या राजकीय भवितव्याची चर्चा कुणी करु नका. त्याची चिंता गोव्याची जनता करणार. मी पणजीतून अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. माझे वडील मनोहर पर्रिकरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. मी भाजपविरोधात नाही. पण तत्त्वांसाठी माझी ही लढाई आहे", असं उत्पल पर्रीकर म्हणाले.
(Inflation reasons | जगात जगणे का होत आहे महाग? जाणून घ्या 5 मोठी कारणे)
शिवसेना की आपसोबत जाणार?
जेव्हा माझे वडील सक्रिय होते तेव्हा मी कधीच दिसलो नसेल. आता मला जे माझ्याबरोबर आहेत त्यांच्यासाठी उभं राहायचं आहे, असंदेखील उत्पल यावेळी म्हणाले. दरम्यान उत्पल पर्रीकर यांना शिवसेना आणि आपच्या ऑफरबद्दल विचारलं तेव्हा आपण कोणत्याही पक्षाची ऑफर स्विकारणार नसल्याचं ते म्हणाले. "मी माझ्याच पक्षाची ऑफर घेत नाहीय. तर दुसऱ्या पक्षाच्या ऑफरचा विचारच होऊ शकत नाही. ते माझ्या मनातच येणार नाही. दुसऱ्या पक्षाचा विचार माझ्या डोक्यात येऊच शकणार नाही", असं उत्पल यांनी स्पष्ट केलं.
"मी माझ्या पक्षाकडेही मला काहीतरी हवंय म्हणून करत नाहीय. त्यांनी मला पर्याय सांगितले. मला लोकांना पर्याय द्यायचे आहेत. माझा विचार गोव्याच्या नागरिकांसाठी आहे. त्यांना पणजीतून जिथे माझा लोकांशी, कार्यकर्त्यांसोबत संबंध आहे, त्यांना ऑप्शन द्यायचं आहे. त्यांनी जर मला रिजेक्ट केलं तर मी मान्य करेन. मी अपक्ष लढत असलो तरी माझ्या मनात भाजप रोज असणार. मी आगामी परिस्थितीला सामोरं जायला तयार आहे", अशी प्रतिक्रिया उत्पल पर्रीकर यांनी दिली.
Published by:Chetan Patil
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.