मुंबई, 12 फेब्रुवारी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) हे नुकतेच राज्यसभेतून निवृत्त झाले. आझाद यांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) भावुक झाले होते. आझाद हे आपले चांगले मित्र असल्याचं सांगत मोदींनी त्यांची जोरदार प्रशंसा केली. मोदींना भाषणाच्या दरम्यान अश्रूही अनावर झाले होते. मोदींनी आझाद यांची जोरदार प्रशंसा केल्यानं ते लवकर काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरु झाली होती. ‘हिंदुस्थान टाईम्स’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये आझाद यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याची वेळ सांगितली आहे. ‘…त्या दिवशी भाजपात प्रवेश करेन’ आझाद यांना मुलाखतीमध्ये भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चेवर प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी ‘ज्या दिवशी काश्मीरमध्ये काळा बर्फ पडेल त्या दिवशी मी भाजपात प्रवेश करेन असं स्पष्ट केलं. भाजपच काय मी त्या दिवशी कोणत्याही दुसऱ्या पक्षात प्रवेश करेन,’’ असं आझाद यांनी यावेळी सांगितलं. या प्रकारचे आरोप करणारी मंडळी मला ओळखत नाहीत, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. (वाचा - ‘मोदी सरकारनं भारताची जमीन चीनला दिली,’ राहुल गांधींचा मोठा आरोप ) मोदींसोबतच्या आठवणी केल्या शेयर नरेंद्र मोदी आणि आपली 1990 च्या दशकापासून ओळख आहे. त्यावेळी आम्ही दोघंही सरचिटणीस होतो आणि टीव्ही शो मध्ये एकमेकांच्या विरुद्ध वादविवाद करत असू. आम्ही कार्यक्रमाच्या दरम्यान एकमेकांशी जोरदार वाद केले. मात्र ज्या दिवशी आम्ही लवकर स्टुडिओमध्ये यायचो त्या दिवशी एकत्र चहा देखील घेतला आहे. सरचिटणीस नंतर आम्ही एकमेकांना मुख्यमंत्री म्हणून ओळखू लागलो. काही दिवसांनी मी आरोग्य मंत्री झालो. त्यावेळी देखील मोदींची वेगवेगळ्या बैठकांमध्ये भेट होत असे. आम्ही दर 10-15 दिवसांनी एकमेकांशी चर्चा केलेली आहे. आमचं नातं हे खूप जुनं आहे,’’ अशी आठवण आझाद यांनी यावेळी सांगितली.
(वाचा - ‘हम्बा हम्बा, रम्बा रम्बा’ ममता बॅनर्जींची ही कुठली घोषणा? VIDEO वर मीम्सचा पाऊस )
‘ते नाटक नव्हतं’ आझाद यांच्या निरोप समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भावूक होण्याबद्दल काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी टोला लगावला होता. त्यावरही आझाद यांनी वेगळं मत व्यक्त केलं आहे. या प्रकारची टीका करणारी लोकं मोदींना ओळखत नाहीत. एक काँग्रेसचा नेता जात आहे तर त्यांना त्रास करुन घ्यायची काय गरज आहे? ते माझ्याबद्दल जे बोलले ती त्यांची भावना होती. ती राजकारणाच्या पलिकडं एक माणूस म्हणून व्यक्त केलेली भावना होती. पंतप्रधानांनी रडण्याचं नाटक केलं असं मला वाटत नाही,’ असं आझाद यांनी सांगितले.