'मोदी सरकारनं भारताची जमीन चीनला दिली,' राहुल गांधींचा मोठा आरोप

'मोदी सरकारनं भारताची जमीन चीनला दिली,' राहुल गांधींचा मोठा आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जमिनीचा भाग चीनला दिला, असा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली , 12 फेब्रुवारी :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जमिनीचा भाग चीनला दिला, असा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला आहे. भारत आणि चीन यांच्यातील वास्तविक नियंत्रण रेषा (LAC) वरुन सैन्य मागं घेण्याची प्रक्रीया सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये बोलताना त्यांनी हा आरोप केला.

काय म्हणाले राहुल ?

भारताची जागा फिंगर 4 वर आहे, तर भारतीय लष्कर फिंगर 3 वर का आले? असा प्रश्न त्यांनी यावेळी विचारला. 'पंतप्रधानांनी फिंगर 4 चीनला का दिलं? आपल्या सैनिकांनी कैलास रेंजवर ताबा मिळवला होता. मात्र ते आता तिथून मागे येत आहेत, हे असं का होत आहे? नरेंद्र मोदी यांनी चीनपुढे शरणागती पत्कारली आहे,' असा आरोप राहुल यांनी यावेळी केला.

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी भारत-चीन प्रश्नावर संसदेत वक्तव्य केलं होतं. राहुल गांधी यांनी या पत्रकार परिषदेत त्यांच्यावरही टीका केली. देपसांगबद्दल संरक्षणमंत्र्यांनी काहीही सांगितलं नाही. त्याचबरोबर गोगरा आणि हॉटस्प्रिंगबद्दलही ते काही बोलले नाहीत. चीननं त्या भागावर ताबा मिळवला आहे, असा दावा राहुल यांनी केला.

पंतप्रधानांवर गंभीर आरोप

"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घाबरट असून ते चीनच्या पुढं टिकू शकले नाहीत. आपल्या सैन्याच्या बलिदानाचा ते अपमान करत आहेत. देशात कुणालाही असं करण्याची परवानगी देता कामा नये. या देशाचं संरक्षण करणे हे पंतप्रधानांची जबाबदारी आहे. ते संरक्षण कसं करायचं हा त्यांचा प्रश्न आहे, माझा नाही.'' अशी टीकही राहुल यांनी यावेळी केली.

Published by: News18 Desk
First published: February 12, 2021, 10:12 AM IST

ताज्या बातम्या