नवी दिल्ली 05 मे : अनेकदा काही लोक आजारपणात डॉक्टरांपेक्षा वैद्य आणि हकीम यांच्यावर जास्त विश्वास ठेवू लागतात. अशी प्रिस्क्रिप्शन कधी कधी जीवघेणी ठरतात. मधुमेहावरील देशी उपचारानंतर किडनी निकामी झाल्याची अशीच एक घटना दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयातून समोर आली आहे. येथे रांची येथील रहिवासी असलेल्या 48 वर्षीय सीता देवी यांना उलट्या आणि किडनीच्या समस्येनंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. महिलेनं सांगितलं की, तिने हकीमच्या सांगण्यावरून मधुमेह बरा होण्यासाठी रोहू माशाचं कच्चं पित्ताशय तीन दिवस खाल्लं होतं. महिलेने सांगितलं की, हा घरगुती उपाय केल्यानंतर काही दिवसांनी तिला उलट्या आणि तीव्र मळमळ होऊ लागली. महिलेची बिघडलेली प्रकृती पाहून कुटुंबीयांनी तिला दिल्लीहून सर गंगाराम रुग्णालयात दाखल केलं. येथे महिलेला नेफ्रोलॉजी विभागात दाखल करण्यात आलं आणि किडनीची समस्या आढळून आल्यानंतर हेमोडायलिसिसचे दोन सेशन करण्यात आले.
महिलेच्या मूत्रपिंडाच्या बायोप्सीमध्ये गंभीर सूज दिसून आली. महिलेची स्थिती सुधारण्यासाठी तिला स्टिरॉइड्सचा उच्च डोस देण्यात आला. अहवालानुसार, महिलेची किडनी 7 दिवसांनंतर बरी होऊ लागली आणि सुमारे दोन आठवड्यांनंतर किडनीच्या सामान्य कार्यासह तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलं. भारतासह आशियातील अनेक भागांमध्ये लोक माशाचं कच्चं पित्ताशय खातात. हे विशेषतः पूर्व आणि दक्षिण भारतात प्रचलित आहे. पारंपारिकपणे, लोकांचा असा विश्वास आहे की ते खाल्ल्याने मधुमेह, दमा, संधिवात, डोळ्यांशी संबंधित समस्यांसह अनेक रोग बरे होतात. यासाठी रोहू (लॅबियो रोहिता) आणि कतला यांसारखे मासे सर्रास सेवन केले जातात. डॉ.ए.के. भल्ला यांनी सांगितलं की, ‘किडनी निकामी होण्याचा धोका या दोन प्रजातींच्या माशांपर्यंत मर्यादित नाही, तर इतर प्रकारच्या माशांचे पित्ताशय खाल्ल्यानेही ही समस्या उद्भवू शकते. म्हणूनच डॉक्टर लोकांना माशाचे कच्चे पित्ताशय न खाण्याचा सल्ला देतात. हे खाल्ल्याने आपल्या पचनसंस्थेत जास्त प्रमाणात पित्त तयार होतं. त्याचं अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. वास्तविक, पित्तामध्ये सायप्रिनॉल नावाचं असं विषारी तत्व असतं, जे किडनीला नुकसान पोहोचवतं. किडनीत समस्या असल्यास रुग्णाला ओटीपोटात दुखणं, उलट्या होणं, लघवी कमी होणं, अशी लक्षणं जाणवतात. यामध्ये रुग्णाची किडनी निकामी होऊ शकते. त्याचा मृत्यूही होऊ शकतो. सर गंगाराम हॉस्पिटलमधील डॉ. वैभव तिवारी, सल्लागार, नेफ्रोलॉजी विभाग, म्हणाले की ‘माशांच्या पित्तामुळे किडनीत होणारी समस्या लक्षात घेता, आम्ही लोकांना अशा माशांचे सेवन करण्यास मनाई करतो, ज्यामध्ये पित्त जास्त प्रमाणात आढळतं. तसंच, मासे चांगले शिजले आहेत याची खात्री करणं आवश्यक आहे. यामुळे माशांच्या आत असलेल्या विषाची पातळी कमी होते. माशांच्या पित्तामुळे एखाद्या व्यक्तीला किडनीच्या समस्येची लक्षणे जाणवत असतील तर त्यांनी ताबडतोब वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. यात हायड्रेशन आणि वेदना कमी करणे यासारख्या उपचारांचा समावेश आहे. यासोबतच किडनीचे इतर कोणतेही नुकसान होणार नाही याचीही काळजी घेतली जाते.