जयपूर 21 जुलै : शुक्रवारी पहाटे राजस्थान ते मणिपूरपर्यंत भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. एकीकडे राजस्थानमध्ये एका तासातच वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत होते, तर दुसरीकडे मणिपूरही भूकंपामुळे हादरलं होतं. राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये तासाभरात तीनदा जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे लोक घराबाहेर पडताना दिसले. जयपूरसह आसपासच्या भागात भूकंपाच्या धक्क्याने संपूर्ण शहर हादरलं असून लोक घराबाहेर पडून रस्त्यावर धावताना दिसत होते. जयपूरमध्ये रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता अनुक्रमे 3.1, 3.4 आणि 4.4 इतकी मोजली गेली. सध्या यात काहीही मोठं नुकसान झाल्याचं वृत्त समोर आलेलं नाही.
Rajasthan | An earthquake of Magnitude 4.4 strikes Jaipur
— ANI (@ANI) July 20, 2023
(CCTV Visuals)
(Video source - locals) pic.twitter.com/MOudTvT8yF
एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी म्हणजेच आज पहाटे जयपूर शहरात एका तासाच्या कालावधीत तीन वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता तीन वेळा स्वतंत्रपणे मोजली गेली. जयपूरमध्ये पहाटे 4 वाजून 25 मिनिटांनी तिसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवले, ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.4 इतकी होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने ही माहिती दिली. या भूकंपाची खोली 10 किलोमीटर इतकी होती. मणिपूरची घटना धक्कादायक, घृणास्पद, लज्जास्पद…; पंतप्रधानांसह चित्रपट कलाकारांनी दिली संतप्त प्रतिक्रिया न्यूज एजन्सी एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, यापूर्वी 4 वाजून 22 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले होते, ज्याची तीव्रता 3.4 इतकी मोजली गेली. तर, 4 वाजून 9 मिनिटांनी सर्वात शक्तिशाली भूकंप आला. जयपूरमध्ये पहाटे 4 वाजून 9 मिनिटांनी झालेल्या भूकंपाची तीव्रता 4.9 इतकी मोजण्यात आली. मात्र, या तिन्ही भूकंपांच्या धक्क्यांमुळे कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की झोपलेले लोकही जागे झाले आणि घराबाहेर पळताना दिसले. भूकंपाच्या धक्क्यांमुळे लोक फोन करून आपल्या नातेवाईकांची विचारपूस करताना दिसले.
मणिपूरमध्येही आज पहाटे भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, मणिपूरच्या उखरुलमध्ये पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले, ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.5 इतकी मोजली गेली. मणिपूरमध्येही या भूकंपामुळे कोणतंही नुकसान झाल्याचं वृत्त नाही. अवघ्या काही मिनिटांच्या अंतराने राजस्थानपासून मणिपूरपर्यंत पृथ्वी हादरताना दिसली. काही लोकांनी सोशल मीडियावर भूकंपाच्या धक्क्यांचे अनेक व्हिडिओ अपलोड केले आहेत, ज्यामध्ये भूकंपाचं भयावह दृश्य पाहायला मिळत आहे.