'हिम्मत असेल तर माझ्यावर खटला दाखल करा', दिग्विजय सिंहांचं मोदी सरकारला ओपन चॅलेंज

'हिम्मत असेल तर माझ्यावर खटला दाखल करा', दिग्विजय सिंहांचं मोदी सरकारला ओपन चॅलेंज

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याकडून भाजपाला ओपन चॅलेंज

  • Share this:

नवी दिल्ली, 6 मार्च: पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख 'दुर्घटना' म्हणून केल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह नवीन वादात सापडले आहेत.  शहीद जवानांचा अपमान करणाऱ्या वादग्रस्त ट्विटमुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून कडाडून टीका होऊ लागली आहे. भाजपकडूनही दिग्विजय यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण याउलट आता दिग्विजय सिंह यांनी भाजपालाच आव्हान दिले आहे. दिग्विजय सिंह यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, मी केलेल्या ट्विटवरून तुम्ही (भाजप)आणि तुमचे मंत्री माझ्यावर पाकिस्तान समर्थक असल्याचा, देशद्रोही असल्याचा आरोप करत आहेत. जर तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर माझ्याविरोधात खटला दाखल करा'

दिग्विजय सिंह यांच्याकडून पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा 'दुर्घटना' म्हणून उल्लेख

शहिदांचा अपमान! दिग्विजय सिंह यांनी पुलवामा हल्ल्याचा 'दुर्घटना' म्हणून केला उल्लेख

दिग्विजय सिंह यांनी मंगळवारी (5 मार्च)पुलवामा दहशतवादी हल्ल्यासंदर्भात ट्विट केले होते. ज्यामध्ये त्यांनी या हल्ल्याचा 'दुर्घटना' म्हणून उल्लेख केला होता. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते की, ''आम्हाला आमच्या जवानांचा, त्यांच्या शौर्याचा अभिमान आहे आणि त्यांच्यावर विश्वासदेखील आहे. सैन्यामध्ये माझ्या अनेक ओळखीचे आणि जवळचे नातेवाईक कार्यरत आहेत. ज्यांना कुटुंबीयांपासून दूर राहून देशवासीयांचे संरक्षण करताना मी पाहिले आहे. आम्ही त्यांचा आदर करतो. पण पुलवामा दुर्घटनेनंतर आपल्या वायुदलाने केलेल्या एअर स्ट्राईक कारवाईवर काही परदेशी माध्यमांमध्ये शंका उपस्थित केली जात आहे, ज्यामुळे भारत सरकारच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे''.

शिवाय, पुलवामा दहशतवादी हल्ल्याला म्हणजे गुप्तचर यंत्रणांचं अपयश असल्याचेही त्यांनी म्हटलं. याप्रकरणी अद्याप कारवाई का करण्यात आली नाही?,NSA, IB प्रमुख आणि Raw प्रमुख यांच्याकडे तुम्ही स्पष्टीकरण मागितले का?, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहेत.

एअर स्ट्राईकवर संरक्षण मंत्री निर्मला सीतारामण यांनी सोडलं मौन; म्हणाल्या...

'या' नेत्यांकडून एअर स्ट्राईकच्या पुराव्यांची मागणी

भारतीय वायुदलानं केलेल्या एअर स्ट्राईकचे पुराव्यांची मागणी विरोधकांकडून वारंवार केली जात आहे. 'एअर स्ट्राईकमध्ये 300 दहशतवादी ठार झाले. तुम्हाला दहशतवाद्यांचा खात्मा करायचा होता? की झाडं उन्मळून टाकायची होती?' असा सवाल पंजाबचे कॅबिनेट मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी केला आहे. हा एक चुनावी जुमला आहे का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.

माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी 'भारतीय हवाई दलानं केलेल्या एअर स्ट्राईकवर आम्हाला शंका नाही. पण, 300 ते 350 दहशतवादी ठार झाल्याचं कुणी सांगितलं?' असा सवाल ट्विटवरून केला.

माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी आंतरराष्ट्रीय मीडियाचा हवाला देत एअर स्ट्राईकनं दहशतवाद्यांचं कोणतंही नुकसान झालं नाही असं म्हटलं. तुम्ही दहशतवादाचं राजकारण करताय का? असं ट्विट करत सरकारला सवाल केला.

तर, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी एअर स्ट्राईक केल्याबाबत भारतीय वायुदलाचं स्वागत केलं. पण, 200 ते 300 दहशतवादी ठार झाले याचा पुरावा काय? असा सवालही केला.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला. हल्ला झाला त्यावेळेस सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.

First published: March 6, 2019, 9:33 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading