नवी दिल्ली, 27 जुलै : स्पाईसजेटवर मोठी कारवाई करत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) 8 आठवड्यांसाठी 50 टक्के फ्लाइट्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. विमानातील बिघाड होण्याच्या वाढत्या घटनांनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. विविध स्पॉट चेक, तपासणी आणि स्पाईसजेटने सादर केलेल्या कारणे दाखवा नोटीसला दिलेले उत्तर लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी डीजीसीएने स्पाईसजेटला वाढत्या तांत्रिक बिघाडांच्या घटना लक्षात घेता कारणे दाखवा नोटीस दिली होती. एअरलाइन्सच्या विमानांमध्ये वारंवार होणाऱ्या तांत्रिक त्रुटी लक्षात घेऊन ही नोटीस पाठवण्यात आली होती. गेल्या 18 दिवसांत स्पाईसजेटच्या विमानांमध्ये 8 वेळा तांत्रिक बिघाड आढळून आला होता. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले होते. तसेच सुरक्षेचा प्रश्नदेखील ऐरणीवर आला होता.
('राजीनामा द्या, नाहीतर वाईट परिणाम भोगावे लागतील', शिंदे गटात सामील झालेल्या खासदाराला धमकी)
संबंधित कंपनीला पाठवण्यात आलेल्या नोटीशीमध्ये वाढत्या तांत्रिक घटनांमध्ये खराब अंतर्गत सुरक्षा निरीक्षण आणि अपुरी देखभाल यामुळे सुरक्षा मार्जिन कमी झाले असल्याचे नमुद करण्यात आले होते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने दुबईहून कोचीला निघालेलं विमान मुंबईच्या दिशेला वळवण्यात आलं होतं. या विमानात 247 प्रवासी होते. या सर्व प्रवाशांसह विमानाची सुखरुप मुंबईत यशस्वीपणे लँडिंग करण्यात आली होती. या 247 प्रवाशांना सुखरुप कोचीला पाठवण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती. विमानात वारंवार तांत्रिक बिघाड होण्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे डीजीसीएकडून आता योग्य काळजी घेतली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Spicejet