Home /News /national /

कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतर वाढवणं फायदेशीर, शास्त्रज्ञांनी संशोधनातून केलं स्पष्ट

कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतर वाढवणं फायदेशीर, शास्त्रज्ञांनी संशोधनातून केलं स्पष्ट

भारतात कोरोनाचा प्रकोप मोठा असून, भारतातही कोविशिल्डच्या (Covishield) दोन डोसेसमधलं अंतर 12 ते 16 आठवड्यांपर्यंत वाढवण्यात आलं आहे.

नवी दिल्ली, 22 मे : लसीकरण (Corona Vaccination) हाच सध्या तरी कोरोनाशी लढा देण्याचा प्रभावी उपाय आहे. मात्र लोकसंख्येच्या प्रमाणात लशींचा पुरवठा पुरेशा प्रमाणात नसणं, ही समस्या भारतासह अनेक देशांत आहे. दरम्यान, दोन डोसेसमधलं (Doses) अंतर वाढवण्याची रणनीती आखली जात असून, हे अंतर वाढवणं शास्त्रीयदृष्ट्याही उपयुक्त असल्याचं शास्त्रज्ञांनी संशोधनातून स्पष्ट केलं आहे. लशीच्या (Vaccine) दोन डोसेसमधलं अंतर वाढवण्यामुळे अधिकाधिक लोकांना लसीकरण करता येऊ शकेल. त्यांच्या दुसऱ्या डोसची वेळ येईपर्यंत पुढच्या लशींची निर्मिती होण्यास वेळ मिळेल. तसंच, शास्त्रीयदृष्ट्या विचार केला, तर पहिल्या डोसनंतर शरीरात प्रतिकारशक्ती (Immunity) तयार होण्यास पुरेसा वेळ मिळतो. दुसरा डोस जास्त कालावधीनंतर दिला, तर विषाणूशी (Corona) प्रतिकार करण्याकरता उत्पादित झालेल्या अँटीबॉडीजची (Antibodies) पातळी 20 ते 300 टक्क्यांपर्यंत जास्त असते, असं संशोधनातून आढळलं आहे. सिंगापूरसारख्या (Singapore) देशांकरता ही स्वागतार्ह बातमी आहे. कारण तिथे गेल्या वर्षी उपाययोजना राबवूनही यंदा छोट्या स्वरूपाच्या गुंतागुंतीच्या संसर्गाचं प्रमाण जास्त असल्याचं आढळत आहे. तिथे लशींच्या दोन डोसेसमधलं अंतर तीन ते चार आठवड्यांपर्यंत होतं. ते आता सात ते आठ आठवड्यांपर्यंत वाढवण्यात आलं आहे. ऑगस्टपर्यंत सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना कमीत कमी एक डोस तरी दिला जावा, असं उद्दिष्ट सिंगापूर सरकारने ठेवलं आहे.

(वाचा - गर्भवतीला कोरोना संसर्ग, व्हेंटिलेटवरचं सिजेरियन; बाळाला पाहताच डॉक्टर हैराण!)

भारतात कोरोनाचा प्रकोप मोठा असून, भारतातही कोविशिल्डच्या (Covishield) दोन डोसेसमधलं अंतर 12 ते 16 आठवड्यांपर्यंत वाढवण्यात आलं आहे. जेव्हा लसीकरणाची सुरुवात झाली, तेव्हा दोन डोसेसमधलं अंतर जास्त असलं, तर किती फायदेशीर ठरतं, याबद्दलचं संशोधन झालेलं नव्हतं. म्हणून अनेक देशांनी संसर्गाचा सर्वांत जास्त धोका असलेल्या नागरिकांचं लसीकरण सुरू केलं. त्यांना दुसरा डोसही वेळेवर दिला जाईल, असं आश्वासन देण्यात आलं. प्रत्यक्षात मात्र 2020च्या अखेरीला ब्रिटनमध्ये कोरोनाची मोठी लाट आली. त्यामुळे तिथे पहिला डोसच जास्तीत जास्त जणांना देण्याचं ठरवण्यात आलं. सुरुवातीला या निर्णयावर टीका झाली. मात्र तो उपाय फायदेशीर असल्याचं संशोधनातून सिद्ध झालं आहे. पहिला डोस दिल्यानंतर शरीरात विषाणूविरोधात अँटीबॉडीज विकसित व्हायला सुरुवात होते. दोन डोसेसमधलं अंतर जितकं जास्त असेल, तितकी अँटीबॉडीज विकसित होण्याची प्रक्रिया दुसऱ्या डोसनंतरही जास्त चांगल्या पद्धतीने होते, असं संशोधनात आढळलं आहे. अर्थात, यात काही उणिवाही आहेत.

(वाचा - ऑगस्टपासून भारतात सुरू होणार Sputnik Vचं उत्पादन,मे अखेरपर्यंत 30 लाख डोस मिळणार)

दोन डोसेसमधलं अंतर वाढवलं, तर अनेक देशांमधल्या सगळ्या नागरिकांचं लसीकरण पूर्ण होण्यास अधिक जास्त वेळ लागेल. एका लशीमुळे काही प्रमाणात संरक्षण नक्की मिळतं; पण दोन्ही डोस घेऊन काही आठवडे होईपर्यंत संबंधित व्यक्ती पूर्णतः सुरक्षित आहे असं मानलं जात नाही. कमी शक्तिशाली लस वापरली जात असेल, तर किंवा विषाणूच्या अधिक संसर्गक्षम स्ट्रेन्स प्रसारित होत असतील तर दोन डोसेसमधलं जास्त अंतर हानिकारक ठरू शकतं.
First published:

Tags: Corona vaccination, Coronavirus, Sanjeevani

पुढील बातम्या