नवी दिल्ली, 22 मे: रशियाने (
Russia) विकसित केलेल्या स्पुटनिक व्ही या कोरोनाप्रतिबंधक लशीच्या (
Corona Vaccine) भारतातल्या उत्पादनाला ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. तोपर्यंत रशियात उत्पादित केलेल्या लशींचा पुरवठा भारताला केला जाणार आहे. भारताचे रशियातले दूत डी. बी. व्यंकटेश शर्मा यांनी शनिवारी (22 मे) ही माहिती दिली. मे महिन्याच्या अखेरीपर्यंत रशियाकडून स्पुटनिक व्ही लशीचे तीस लाख डोसेस भारतात येणार आहेत. जून महिन्यात हा आकडा 50 लाखांपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे.
रशियातील स्पुटनिक व्ही (
Sputnik V) या लशीच्या मॅन्युफॅक्चरर्सनी भारतात डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी (
Dr. Reddy's Laboratory) या कंपनीशी करार केला आहे आणि आतापर्यंत दोन लाख डोस भारतात दाखलही झाले आहेत. मात्र अद्याप ही लस देशात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झालेली नाही. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सध्या आयात केलेल्या डोसेसची किंमत प्रति डोस 995.4 रुपये ठरवण्यात आली आहे. त्यात प्रति डोस MRP 948 रुपये असून, प्रत्येक डोसवर पाच टक्के जीएसटी आकारला जात आहे. त्यामुळे एकूण किंमत 995.4 रुपये एवढी होते. स्पुटनिक व्ही ही भारतात वापरासाठी परवानगी मिळालेली तिसरी लस असून, सध्या कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर केला जात आहे.
हे वाचा-Covaxin घेणाऱ्यांना परदेशात नाही मिळणार प्रवेश? WHO च्या यादीत नसल्यानं अडचणी
रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडकडून (
RDIF) आयात केलेल्या स्पुटनिक व्ही या लशीचं पहिलं कन्साइन्मेंट एक मे रोजी भारतात दाखल झालं असून, सेंट्रल ड्रग्ज लॅबोरेटरीकडून त्याला मंजुरी मिळाली.
त्यानंतर काही दिवसांपूर्वीच डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीने या लशीचं सॉफ्ट-लाँचिंग केलं. या कंपनीचे सीनिअर एक्झिक्युटिव्ह दीपक सप्रा यांनी या लशीचा पहिला डोस घेतला आणि या लशीच्या लसीकरणाला भारतात सुरुवात झाली.
रशियाच्या राजधानीचं शहर असलेल्या मॉस्कोमधल्या (
Moscow) गामालेय रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमिऑलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी या संस्थेने स्पुटनिक व्ही ही लस विकसित केली आहे. त्यासाठी रशियन डेव्हलपमेंट अँड इन्व्हेस्टमेंट फंडची (
RDIF) मदत घेण्यात आली आहे. रशियात ऑगस्ट 2020मध्ये गॅम-कोविड-व्हॅक (
Gam-Covid Vac) या नावाने तिची नोंदणी झाली आहे. स्पुटनिक व्ही हे व्हायरल व्हेक्टर व्हॅक्सिन असून, मानवात सर्दीसाठी (
Adenovirus) कारणीभूत असलेल्या दोन विषाणूंचा वापर या लशीत करण्यात आला आहे. या लशीचे दोन्ही डोसेस वेगवेगळे असतात. (कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या लशींचे दोन्ही डोसेस सारखेच असतात.) स्पुटनिक व्ही या लशीच्या दोन डोसेसमध्ये तीन आठवड्यांचं अंतर असणं गरजेचं आहे.
हे वाचा-Covishield च्या 2 डोसमधील अंतर वाढवलं, Covaxin मधील का नाही? सरकारचं स्पष्टीकरण
या लशीच्या वापराला भारतासह 60हून अधिक देशांत मान्यता मिळाली आहे. हैदराबादच्या डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीच्या मार्गदर्शनाखाली भारतात सहा कंपन्या या लशीचं उत्पादन करणार आहेत. स्पुटनिक व्ही ही लस सर्वांत जास्त म्हणजे 91.6 टक्के प्रभावी ठरत असल्याचं आढळलं आहे. त्याखालोखाल मॉडर्ना आणि फायझर यां कंपन्यांच्या एम-आरएनए लशी किमान 90 टक्के प्रभावी असल्याचं आढळलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.