नवी दिल्ली, 7 ऑगस्ट : शिदे-फडणवीस सरकार राज्यात स्थापन होऊन महिना उलटून गेला आहे. तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. यावर विरोधकांनी जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. दरम्यान आता मंत्रिमंडळ विस्ताराची नवीन तारीख समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 15 ऑगस्टपूर्वी किमान 15 मंत्र्यांचा समावेश करून त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करतील. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महत्त्वपूर्ण गृहखाते सांभाळतील अशी अपेक्षा आहे. सूत्रांनी रविवारी ही माहिती दिली. इतर मागासवर्गीय (ओबीसी) आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीमुळे राज्यातील निवडणुकांना विलंब होत असल्याचेही उच्च सरकारी सूत्रांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्टीकरण मिळाल्यानंतर त्या ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले. शिवसेनेतील बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांचं सरकार पडल्यानंतर 30 जून रोजी शिंदे आणि फडणवीस यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या दोघेजण तेव्हापासून दोन सदस्यीय मंत्रिमंडळ म्हणून काम करत आहेत, ज्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांनी टीका केली आहे. अजित पवार हे विरोधी पक्षनेते आहेत, ते अशा गोष्टी सांगत राहतील, असे फडणवीस यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. अजितदादा हे सहज विसरतात की, ते सरकारमध्ये असताना पहिल्या 32 दिवसांत फक्त पाचच मंत्री होते. पत्रकारांच्या वारंवार प्रश्नांना उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार तुमच्या विचारापेक्षा लवकर होईल.” हा विस्तार 15 ऑगस्टपूर्वी केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. ..कामावर कोणताही परिणाम झालेला नाही : मुख्यमंत्री शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मंत्रिपरिषदेच्या विस्ताराला झालेल्या दिरंगाईमुळे राज्य सरकारच्या कामावर कोणताही परिणाम झालेला नाही आणि लवकरच आणखी मंत्र्यांचा समावेश केला जाईल. याकाळात कोणाचीही कामे थांबणार नाही. मी आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेत असून जनतेची कामं थांबणार नाहीत, असे मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
‘…अजितदादांना आता ते विसरावं लागेल’, देवेंद्र फडणवीसांचं दिल्लीतून प्रत्युत्तर
फडणवीस म्हणाले की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील कामगिरी सुधारण्यासाठी भाजपने अशा 16 लोकसभा मतदारसंघ निवडले आहेत, जिथे विरोधी पक्ष सातत्याने विजयी होत आहेत. त्यात आता शिंदे छावणीत सामील झालेल्या शिवसेनेच्या नेत्यांच्या मतदारसंघांचाही समावेश असल्याचे ते म्हणाले. “शिवसेना आणि भाजप लोकसभा निवडणूक युतीने लढणार असल्याने या मतदारसंघातून विद्यमान लोकसभा सदस्यांचा विजय निश्चित करण्यासाठी भाजप प्रयत्नशील राहील,” असे फडणवीस म्हणाले. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपचे प्रयत्न ते म्हणाले की, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना बारामतीमध्ये भारतीय जनता पक्षाची (भाजप) कामगिरी सुधारण्यासाठी समन्वय साधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे, जिथे गेल्या निवडणुकीत पक्षाला चांगली मते मिळाली होती. या 16 मतदारसंघात भाजप आपली ऊर्जा कामगिरी सुधारण्यावर केंद्रित करेल, असे फडणवीस म्हणाले. बारामतीचे प्रतिनिधित्व सध्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे करत आहेत. ही जागा पवार घराण्याचा बालेकिल्ला मानली जाते.