काही दिवसांपूर्वी पेटपुराण नावाची वेबसीरिज आली होती. यात मूल जन्माला घालण्याऐवजी त्या दाम्पत्याने एक कुत्र्याचं पिल्लू पाळण्याचा निर्णय घेतला. आणि त्यानंतर सुरू झाला त्यांचा पेटपालकांचा धमाकेदार प्रवास. या पृथ्वीतलावर अशी एक जमात आहे, ज्यांना प्राणीपालक म्हणून ओळखलं जातं. हे सर्वसाधारण व्यक्तींपेक्षा खूप वेगळे असतात. आपल्या प्राण्यासाठी मग ती मांजर असो, कुत्रा असो, ससा वगैरे वगैरे…यांच्यासाठी काहीही करण्याची तयारी असते. अगदी जिथं आपल्या प्राण्यांना एन्ट्री मिळणार नाही, अशा ठिकाणचा पत्तादेखील ते विचारत नाहीत. एखादी व्यक्ती आपल्या मुलांवर जेवढं प्रेम करणार नाही, कदाचित त्याहून अधिक यांचा आपल्या पेटवर जीव असतो. मी सीमा आणि माझा नवरा राहुल..आम्हीदेखील याच जमातीतले. लग्नाची पाच वर्षे पूर्ण झालीत. आणि मी, राहुल आणि ऑस्करच्या संसाराच तीन वर्षे. साधारण 3 वर्षांपूर्वी आम्ही एक कुत्रा पाळण्याचा निर्णय घेतला. मूल होण्याबाबत दोघेही फार पॉझिटिव्ह नव्हतो. पण दोघांसोबत एखादा कुत्रा असावा ही आमची लग्नापूर्वीपासूनच इच्छा. त्यानुसार ऑस्करची एन्ट्री झाली आणि आमचा आनंदी संसार सुरू झाला.
अनेकांना वाटत असेल, एक कुत्रा सांभाळण्याची तुलना मुलासोबत कशी काय होऊ शकते? परंतू आम्ही 3 वर्षांच्या अनुभवाने सांगतो, जितकी एखाद्या बाळाची काळजी घ्यावी लागते, अगदी तशीच काळजी आम्हालाही ऑस्करची घ्यावी लागते. काही महिन्यांचा होता तेव्हा ऑस्करला आम्ही दत्तक घेतलं. सोनेरी केसांचा, सुंदर चेहऱ्याचा, कोणालाही प्रेमात पाडतील असे छोटेसे डोळे…अजूनही ऑस्करचं बालपण आमच्या लक्षात आहे. त्याला केलेला पहिला स्पर्श…त्याला कुशीत घेऊन फिरवलेले ते दिवस..अगदी मुंबईतील अनेक भागात त्याला घेऊन फिरलो. ऑस्कर आला आणि आमचं आयुष्यच बदललं. दोघांचाही एक दिनक्रम सुरू झाला. सकाळी मी आणि राहुल एकत्रच त्याला वॉकला घेऊन जातो. आम्हाला सकाळी नाश्ता करायची सवय नाही, पण ऑस्करसाठी आवर्जुन करावा लागतो. तो देखील वेगवेगळा. कधी दूध-ब्रेड, कधी बिस्कीट तर कधी डॉग फू़ड. राहुल शाकाहारी आहे. पण मार्केटमध्ये जाऊन ऑस्करला आवडतं तसं चिकनही घेऊन येतो आणि विशेष म्हणजे तो स्वत: शिजवतोही.
ऑस्कर एक कुत्रा असला तरी नियमित त्याची वैद्यकीय तपासणी करावी लागते. लस द्यावी लागते. त्याला नेमका काय त्रास होतोय हे ते सांगू शकत नाही. त्यामुळे त्याच्या वागणुकीतून तुम्हालाच ते ओळखावं लागतं. अगदी त्याची फिरण्याची वेळ ठरलेली असते. तो फक्त प्रेम करतो..फक्त प्रेम… गेल्या अनेक वर्षांच्या अनुभवाने एक गोष्ट मात्र माझ्या लक्षात आलीये. ती म्हणजे प्राणी यांना फक्त प्रेम द्यायचं माहिती असतं. एकदा का ते तुमच्या प्रेमात पडले तर तुम्ही जिंकलात. अगदी तुम्ही त्यांना कितीही दूर लोटलं, ओरडलात, चिडलात तरीही ते तुमच्यावर प्रेमच करतील. कामावरून घरी आलात आणि त्यांना गोंजारलं तरी तुमचा थकवा, तणाव दूर होतो. ते तुमच्यावर इतका जीव लावतात. कुत्रा असेल तर हृदय रोगाचा धोका कमी.. काही वर्षांपूर्वी BBC मध्ये एक लेख आला होता. यानुसार, कुत्रा पाळणाऱ्या लोकांना हृदयरोग आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका कमी असतो, असं एका संशोधनातून समोर आलं आहे. ज्यांच्या घरात कुत्रा असतो, ते अधिक सक्रिय असतात. त्याशिवाय डॉग थेरेपी याच्या माध्यमातून त्यांना तणाव कमी करणे सोपे जाते. कुत्र्याला पाळल्याने तणाव संप्रेरक कोर्टिसोल कमी होते, तर लोक आणि त्यांचे कुत्रे यांच्यातील सामाजिक संवाद प्रत्यक्षात फील-गुड हार्मोन ऑक्सीटोसिनची पातळी वाढवते. हाच हार्मोन आई आणि बाळांना जोडणारा असतो. विशेष म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती रडते तेव्हा त्याच्या कुत्र्यांनाही त्रास होतो. नवीन अभ्यासानुसार, कुत्रे त्यांचे मालक दुःखी आहेत हे पाहून त्यांना फक्त त्रासच होत नाही तर ते मदतीसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न देखील करतात.
मुलाची कमतरताच भासत नाही.. विशेष म्हणजे आम्ही दोघेही DogLover आहोत. त्यामुळे ऑस्करच्या येण्यामुळे आम्ही दोघेही खूप आनंदी असतो. इतके की, स्वत:च मूल असावं असं आम्हाला वाटतही नाही. तोच आमचं सर्वस्व आहे. अनेक दाम्पत्य तर संपत्तीदेखील कुत्र्याच्या नावावर करतात. गेल्या वर्षी अमेरिकेतल्या जू इसेन हिने आपली सर्व संपत्ती पाळीव कुत्रा फ्रान्सिस्को याच्या नावावर करण्याची घोषणा केली. 35 वर्षांची मॉडेल जू तिच्या फ्रान्सिस्को कुत्र्यावर जिवापाड प्रेम करते. ती फ्रान्सिस्कोला मुलाप्रमाणं जीव लावते. इन्स्टाग्रामवरच्या (Instagram) बहुतांश पोस्टमध्ये ती या कुत्र्यासोबत दिसते. जू फ्रान्सिस्कोला तिच्या खासगी जेटमधून (Private Jet) फिरायला नेते आणि त्याला स्टायलिश कपडे घालते. फ्रान्सिस्कोची जीवनशैली एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे आहे. हा कुत्रा तब्बल 15 कोटींच्या संपत्तीचा मालक होणार आहे. ही स्थिती फक्त परदेशातीलच आहे असं नाही. तर मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील शेतकऱ्याने त्याच्या संपत्तीचा अर्धा हिस्सा आपल्या कुत्र्याच्या नावे केला आहे. ओम नारायण वर्मा हे 50 वर्षांचे असून ते माजी सरपंचही आहेत. त्यांना चार मुली आणि एक मुलगा आहे. मात्र, ओम वर्मा हे आपल्या मुलांच्या वागणुकीवर नाखूष असून, आपल्या मुलांवर त्यांचा अजिबात विश्वास नाही. आपल्या पश्चात संपत्तीवरून हाेणारे वाद टाळण्यासाठी त्यांनी मृत्यूपत्र तयार केलं आहे. आणि यात 18 एकर जमिनीची पत्नी आणि पाळीव कुत्रा या दाेघांमध्ये समप्रमाणात विभागणी केली आहे.