कोरोनाविरुद्ध जिंकला पण समाजाने हरवलं, इंजिनिअरला घ्यावा लागला घर विकायचा निर्णय

कोरोनाविरुद्ध जिंकला पण समाजाने हरवलं, इंजिनिअरला घ्यावा लागला घर विकायचा निर्णय

'कोरोनातून बरा होऊन परतलो तेव्हा मी खून केला असल्यासारखं बघायचे' असं कोरोनातून बरा झालेल्या तरुणाने म्हटलं आहे.

  • Share this:

शिवपुरी, 13 एप्रिल : कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. परदेशातून किंवा कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव असलेल्या भागातून गावी आलेल्या लोकांकडे थोड्या संशयानंच बघितलं जात आहे. फक्त कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या भागातून आलेल्यांची ही अवस्था असेल तर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांकडे पाहण्याचा दृष्टीकोन किती धक्कादायक असू शकतो याचं एक उदाहरण समोर आलं आहे. कोरोनाविरुद्धची लढाई त्यानं जिंकली पण समाजाने दिलेल्या वागणुकीसमोर मात्र तो हरला. दुबईहून आलेल्या मध्य प्रदेशातील शिवपुरी इथल्या इंजिनिअर दीपक शर्मा यांना कोरोनाची लागण झाली होती. यातून ते ठणठणीत बरे झाले आणि 4 एप्रिलला घरी पोहोचले. मात्र यानंतर काही दिवसांच्या आतच त्यांना घराबाहेर घर विकायचं आहे असा बोर्ड लावण्याची वेळ आली.

घराबाहेर लावलेल्या बोर्डबद्दलचं कारण सांगताना दीपक म्हणाले की, मी कोरोनातून मुक्त झाल्यानंतर वडिलांनी घर विकण्याचा निर्णय घेतला. यासाठी घराबाहेर बोर्ड टांगला आहे. कोरोना झाल्यामुळं शेजारच्या लोकांनी बहिष्कार टाकल्यासारखं वागायला सुरुवात केली. ज्या दिवशी घरी परत आलो तेव्हा लोक माझ्याकडे मी कोणाचा तरी खून केला असल्यासारखं बघत होते. काही दिवसांत हे वागणं बदलेल असं वाटलं होतं पण यात वाढच होत गेली असंही दीपक यांनी सांगितलं.

शेजाऱ्यांनी इतका त्रास द्यायला सुरू केला की जे लोक घरी ये-जा करायचे ते आता आम्हाला बघून गेट बंद करतात. जिथं राहतो तिथले लोक आमच्या घरी भाजीवाला, दूधवाला यांना येऊ देत नाहीत. कोरोना व्हायरसची भीती लोकांना घालतात असंही दीपक यांनी सांगितलं. यामुळे वैतागून शेवटी वडिलांनी इथून जाण्यासाठी घर विकण्याचा निर्णय घेतला असल्याचा दीपक म्हणाला.

हे वाचा : Coronavirus गर्दी हटवण्यासाठी भाजी बाजारात आता नवा सम-विषम प्रयोग

दीपकडे वडील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आहेत. ते म्हणाले की, लोकांना आम्ही या ठिकाणी राहू नये असं वाटतं. हे घर त्यांच्याच ओळखीच्या कोणालातरी ते द्यावं. लोक रात्री अपरात्री येऊन घराचा दरवाजा वाजवतात आणि त्रास देतात. आता लॉकडाऊन संपल्यानंतर दीपक त्याच्या कामावर परत जाईल. त्यामुळे इथं न राहण्याचा निर्णय घेतला आहे. घर विकल्यानंतर ग्वाल्हेरला जाण्याचा निर्णय घेतला आहे.

हे वाचा : 800 अमेरिकन नागरिकांनी दिला भारत सोडण्यास नकार, 'हे' आहे कारण

संपादन - सूरज यादव

First published: April 13, 2020, 5:01 PM IST

ताज्या बातम्या