कोलकाता, 20 जुलै : Corovirus वर रामबाण औषध किंवा लस विकसित होत नाही तोपर्यंत सोशल डिस्टन्सिंग हाच विषाणूचा फैलाव रोखण्याचा उपाय आहे. जगभरात सगळीकडे त्यामुळे अनेक देश पुन्हा एक टाळेबंदीच्या निर्णयाकडे परतू लागले आहेत. मार्चपासून भारतात शहरांमध्ये लॉकडाऊनची कमी अधिक अंमलबजावणी सुरूच आहे आणि सगळं बंद ठेवून चालणार नाही हेसुद्धा स्पष्ट झालं आहे. आता पश्चिम बंगाल राज्यात यावर एक नवा उपाय शोधून काढण्यात आला आहे. विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रत्येक आठवड्यातून दोन दिवस कडकडीत बंद पाळण्यात येईल, असे आदेश निघाले आहेत. पश्चिम बंगालचे गृहसचिव अलपन बंडोपाध्याय यांनी दिलेल्या माहितीनुसार, चालू आठवड्यात गुरुवार 23 जुलै आणि शनिवार 25 जुलैला कडक लॉकडाऊन असेल. यादिवशी सगळी दुकानं बंद राहतील आणि अत्यावश्यक सेवांशिवाय नागरिकांनी घरीच राहावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. आठवड्यातून कुठले दोन दिवस बंद ठेवायचा याचा निर्णय राज्य सरकार कळवत जाईल, असा सध्याचा प्लॅन आहे. बाजारातली गर्दी टाळण्यासाठी इतर दिवशी सोशल डिस्टन्सिंगचे इतर नियम पाळून बाजारपेठा आणि इतर उद्योग सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये मात्र पूर्वीसारखेच निर्बंध असतील. तिथे दोन दिवस नाही तर सर्व दिवस प्रतिबंधाचे निर्बंध लागू असतील. पश्चिम बंगालमध्ये बँकासुद्धा आठवड्यातून पाचच दिवस उघड्या राहतील, असं सांगण्यात आलं आहे. प्र्त्येक शनिवार- रविवारी सगळे बँक व्यवहार बंद राहतील. नागरिकांसाठी बँक व्यवहाराची वेळ सकाळी 10 ते 2 पर्यंतच असेल. पश्चिम बंगाल विशेषतः कोलकात्यात Coronavirus चा संसर्ग वाढू लागला आहे. काही भागात सामुदायिक संसर्ग सुरू झाला असल्याचीही बातमी आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊनचा हा नवा नियम करण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत तबब्ल 40 हजार 425 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंतची ही सर्वात जास्त आकडेवारी आहे. तर, 24 तासांत 681 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह भारतातील कोरोना रुग्णांनी आता 11 लाखांचा आकडा पार केला आहे. सध्या देशात 11 लाख 18 हजार 43 कोरोना रुग्ण आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.