नवी दिल्ली, 03 एप्रिल : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने 21 दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली. हा लॉकडाउन 14 एप्रिलपर्यंत असणार आहे. दरम्यान, लॉकडाउन वाढण्याची शंकाही सध्या व्यक्त केली जात आहे. सरकारडून लॉकडाउन वाढवणार नसल्याचं सांगण्यात आलं असलं तरी आता एअर इंडियानं शुक्रवारी केलेल्या घोषणेमुळं पुन्हा शंका निर्माण झाली आहे. सरकारी एअर लाइन्सने म्हटलं की, शुक्रवारपासून 30 एप्रिल पर्यंत सर्व डोमेस्टिक आणि आंतरराष्ट्रीय मार्गावरील बुकिंग बंद कऱण्यात आलं आहे. 14 एप्रिलनंतरच्या बुकिंगसाठीच्या निर्णयाची वाट बघत असल्याचंही एअरलाइन्सने म्हटलं आहे. मात्र, एअरलाइन्सच्या या निर्णयाने आता लॉकडाउन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांवर केंद्र सरकारने उत्तर दिलं होतं. तेव्हा सांगण्यात आलं होतं की, कोरोना व्हायरसमुळे देशात 21 दिवसांचे लॉकडाउन घोषित करण्यात आलं आहे. ते पुढे वाढवण्यात येणार नाही असं स्पष्टीकरण कॅबिनेट सचिव राजीव गाबा यांनी 30 मार्चला दिलं होतं. सरकारने सध्यातरी लॉकडाउन वाढवण्याबाबत कोणताच निर्णय घेतलेला नाही असं त्यांनी सांगितलं होतं.
Bookings now closed till 30th April from today for all domestic and international routes. We are awaiting a decision post 14th April: Air India pic.twitter.com/Cpdp5QcJOx
भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. यामुळेच सरकार लॉकडाउन वाढवण्याचा विचार करत असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, सरकारकडून यावर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. भारतात आतापर्यंत कोरोनाचे 2457 रुग्ण आढळले असून 62 जणांचा मृत्यू झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात 24 मार्चपासून 21 दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकांना आवाहन केलं होतं की, या आजारापासून वाचण्यासाठी तुम्ही घरातच रहा, घरातून बाहेर पडू नका. सोशल डिस्टन्सिंगमुळेच कोरोना रोखता येणं शक्य आहे.