नवी दिल्ली, 13 जून : भारतात (india) कोरोनाव्हायरसची (coronavirus) प्रकरणं वेगानं वाढत आहे. महिलांच्या (female) तुलनेत संक्रमित पुरुषांची (male) संख्या जास्त आहे. मात्र तरी कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू होण्याचा सर्वात जास्त धोका हा महिलांना आहे, असं नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात दिसून आलं आहे.
ग्लोबल हेल्थ सायन्स जर्नलमध्ये (Journal of Global Health Science) हे संशोधन प्रकाशित झालं आहे.
भारत आणि अमेरिकेतील काही शास्त्रज्ञांनी हा अभ्यास केला. भारतातील कोरोनाव्हायरसची 20 मेपर्यंतच्या आकडेवारी पाहण्यात आली. या आकडेवारीनुसार,
भारतात 66 टक्के पुरुष आणि 34 टक्के महिला कोरोना संक्रमित आहेत. मात्र कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूदराचं प्रमाण हे महिलांमध्ये जास्त आहे. कोरोना संक्रमित महिलांचा मृत्यू दर 3.3 टक्के आहे. तर कोरोना संक्रमित पुरुषांचा मृत्यू दर 2.9 आहे.
हे वाचा - चीनमध्ये पुन्हा आला कोरोना, बीजिंगमधील अनेक भागांमध्ये पुन्हा लॉकडाऊन
संशोधनाचे अभ्यासक प्रोफेसर एसव्ही सुब्रमण्यम यांच्या मते, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूदराचा लिंगानुसार अभ्यास करणंही गरजेचं. याआधी इतर देशांमध्ये झालेल्या रिसर्चनुसार कोरोना संक्रमणामुळे महिलांपेक्षा पुरुषांना जास्त धोका असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र आता महिलांनी विशेष काळजी घ्यायला हवी.
भारतात कोरोनाबाधितांचा 3 लाखांचा टप्पा पार
भारतात आतापर्यंत एकूण 3,08,993 जणांना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 8 हजार 884 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासामध्ये सर्वाधिक 11458 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. भारतात मागील 24 तासांमध्ये 386 लोकांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. एकीकडे ही काळजी वाढवणारी आकडेवारी समोर येत असताना कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येने काहीसा दिलासा मिळाला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 49.94 टक्के इतका असून आतापर्यंत देशभरात 1,54,330 बरे झाले आहेत.
हे वाचा - सर्दी-खोकल्याच्या आधी कोरोनाची ही लक्षण येतात समोर, नव्या अभ्यासात दावा
दरम्यान, भारतातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आलेली नाही. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या देशांच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर गेल्याने चिंता वाढली आहे. एकीकडे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात असताना श्री गंगाराम रुग्णालयाचे डॉक्टर एस पी ब्योत्रा यांनी मात्र कोरोनाचा फैलाव सध्याच्या घडीला कमी होण्याची सध्या कोणतीही चिन्हं नसल्याचं म्हटलं आहे.
संकलन, संपादन - प्रिया लाड
हे वाचा - पूजेसाठी आलेल्या गुरुजींनी आशीर्वादासोबत कोरोनाही दिला, नवरदेवाला लागण मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.