

सर्दी, खोकला आणि ताप ही कोरोना विषाणूची सर्वसाधारण लक्षणं आहेत. पण एका नव्या अभ्यासानुसार, कोव्हिडच्या बर्याच रुग्णांमध्ये न्यूरोलॉजिकल लक्षणं असल्याचं समोर आलं आहे. अमेरिकेच्या नॉर्थवेस्टर्न मेडिसीनचा यासंबंधी अभ्यास केला आहे. रूग्णांच्या न्यूरोलॉजिकल लक्षणांवरील हा आढावा अॅनाल्स ऑफ न्यूरोलॉजीमध्ये प्रकाशित झाला आहे.


रुग्णालयात दाखल केलेल्या अर्ध्याहून अधिक रूग्णांनी डोकेदुखी, चक्कर येणं, अस्वस्थता, लक्ष केंद्रित करण्यात अडचण, गंध आणि चव गमावणं, झडके, अशक्तपणा आणि स्नायू दुखणे अशी न्यूरोलॉजिकल लक्षणं दर्शविली आहेत.


अभ्यासाचे लेखक आणि न्युरो-संसर्गजन्य रोगांचे नॉर्थवेस्टर्न मेडिसिन चीफ डॉक्टर इगोर कोरलॅनिक म्हणाले की, "सामान्य लोकांना आणि डॉक्टरांना याची जाणीव असणं आवश्यक आहे. कारण कोरोना विषाणूच्या संसर्गाचा ताप, कफ आणि श्वसन समस्या शरीरात न्यूरोलॉजिकल लक्षणांपूर्वी आहे.


कोरोना विषाणू मेंदू, पाठीची हाडं, मज्जातंतू आणि स्नायूंसह संपूर्ण मज्जासंस्थेस प्रभावित करतात. डॉक्टर कोरालनिक म्हणतात की, कोव्हिडच्या वेगवेगळ्या मार्गांनी न्यूरोलॉजिकल डिसफंक्शन होऊ शकतं. हा रोग विशेषत: फुफ्फुस, मूत्रपिंड आणि हृदयावर अधिक परिणाम करतो. पण ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्याचा मेंदूवरही परिणाम होतो.


ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे क्लॉटिंग डिसऑर्डरसुद्धा होण्याची भीती असते. ज्यामुळे इस्किमिक किंवा हेमरेजिक (रक्तस्राव) स्ट्रोक देखील होतो. या विषाणूंमुळे मेंदू आणि मेनिन्जेसमध्ये थेट संसर्ग होऊ शकतो. या व्यतिरिक्त, रोगप्रतिकारक प्रणालीत जळजळ होऊ शकते, ज्यामुळे मेंदू आणि नसा खराब होऊ शकतात.