लखनऊ, 15 मार्च : कोरोनामुळे जगात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. भारतातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. रविवारपर्यंत देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 100 वर पोहोचली असून यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. अनेकांनी कोरोनाचा धसकाच घेतला आहे. उत्तर प्रदेशात तर कोरोनाच्या भीतीचं धक्कादायक असंच प्रकरण समोर आलं आहे. चीनमधून परतलेल्या विद्यार्थीनीला पाहताच डॉक्टर खुर्ची सोडून पळून गेल्याचा प्रकार घडला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, तीन फेब्रुवारीला एक विद्यार्थीनी चीनमधून परतली होती. तेव्हापासून तिला 28 दिवसांसाठी तिला देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर सर्दी आणि खोकल्याच्या उपचारासाठी ती जिल्हा सरकारी रुग्णालयात गेली होती. तेव्हा तिने डॉक्टरांना सांगितलं की, ती चीनमध्ये एमबीबीएसचं शिक्षण घेत आहे. हे ऐकताच डॉक्टर तिथून पळून गेले. हे धक्कादायक होतं.
रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांनी याची माहिती रॅपिड रिस्पॉन्स टीमला दिली. त्यानंतर पथकाने घरी जाऊन विद्यार्थीनीची तपासणी केली. या चाचणीत कोरोना व्हायरसची कोणतीच लक्षणे नसल्याचं समोर आल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.
हे वाचा : Corona ची 'आपत्ती' - कायदा मोडणाऱ्यांना तुरुंगवास; मृतांच्या कुटुंबांना 4 लाख
बेंगळुरुतही असंच काहीसं घडलं होतं. इटलीत हनीमून करून परतलेली महिला पतीला कोरोना झाल्यानंतर हादरून गेली होती. तिने पतीला सोडून थेट माहेर गाठलं होतं. त्याआधी पतीला कोरोना झाल्यानंतर दोघांनाही आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं होतं.
हे वाचा : कोरोनाला रोखण्यासाठी भारताकडे आहेत फक्त 30 दिवस, तज्ज्ञांनी दिला इशारा