जोधपूर, 14 एप्रिल: देशात सध्या कोरोना विषाणूचं संक्रमण
(Corona Pandemic) वेगात वाढत आहे. कोरोना विषाणूचा नवीन स्ट्रेन (Corona virus new Strain) अधिक धोकादायक आणि संसर्गजन्य ठरत आहे. त्यामुळे देशात दररोज दीड लाखाहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची (Corona cases) नोंद होतं आहे. अशातचं राजस्थानातील जोधपूर शहरात दर दोन मिनिटाला एका व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहे. त्यामुळे जोधपूर शहरातील नागरिकांच्याही चिंता वाढत आहे. शहरातील सीएमएचओच्या रिपोर्टनुसार, शहरात 770 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. शिवाय चार कोरोना रुग्णांचा मृत्यूही झाला आहे.
IIT नंतर आता एका वसतिगृहातील 22 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह
जोधपूर आयआयटीमध्ये 74 विद्यार्थ्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची बातमी समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर आता जोधपूर शहरातील राजपुरोहित समाजाच्या वसतिगृहामध्येही कोरोना विस्फोट झाला आहे. राजपुरोहित समाजाच्या वसतिगृहामध्ये राहणाऱ्या एकूण 22 विद्यार्थ्यांना कोरोना संसर्गाची लागण झाली आहे. वसतिगृहात कोरोना विस्फोट झाल्यानंतर वसतिगृह परिसराला कंटेनमेंट झोन घोषित केलं आहे. याव्यतिरिक्त, संबंधित विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्येच विलगीकरणात ठेवलं आहे.
गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी संक्रमणाचा वेग वाढला
सध्या देशात कोरोना विषाणूची दुसरी लाट आली आहे. कोरोना विषाणूचा नवीन स्ट्रेन अधिक संसर्गजन्य आहे. त्यामुळे कुटुंबातील एखाद्या व्यक्तीस जरी कोरोना संसर्ग झाला असेल आणि तो वेळेत अलग नाही झाला, तर तो संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण होण्याचा धोका वाढला आहे. दररोज हजारो लोकांना संक्रमण होण्याचं हेच मुख्य कारण आहे.
(वाचा-Corona उद्रेकाचा पंतप्रधान मोदी घेणार आढावा; सर्व राज्यपालांसोबत महत्त्वाची बैठक)
कोविड लशीनंतर रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा
जोधपूर शहरात कोरोना लशीचा साठा संपल्याची घटना ताजी असताना, शहरात आता रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. कोरोना विषाणूच्या गंभीर रूग्णांवर उपचार करण्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर केला जात आहे. असं असताना अनेक ठिकाणी या इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. काही सरकारी रुग्णालयांचा अपवाद वगळता इतर ठिकाणी या इंजेक्शनची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.