नवी दिल्ली, 14 एप्रिल : देशातील कोरोना (Corona in India) स्थिती अतिशय चिंताजनक असून दुसऱ्या लाटेमध्ये महाराष्ट्रासह इतर काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येचा अक्षरश: उद्रेक होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) बुधवारी सर्व राज्यांच्या राज्यपालांसोबत (Governor) बैठक घेणार आहेत. या बैठकीला उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Vice President Venkaiah Naidu) हेदेखील उपस्थित असणार आहेत. राज्यपालांसोबत होणारी ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. महाराष्ट्रातील कोरोना स्थिती अतिशय विदारक असून दिवसाला साठ हजाराहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. याबरोबरच इतर राज्यांमध्येही रुग्ण संख्येमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या अगोदर 8 एप्रिल रोजी पंतप्रधान मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली होती. त्यावेळी त्यांनी सर्व राज्यपालांनाही कोरोना विरोधातील मोहिमेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. सर्वच मुख्यमंत्र्यांवर कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा दबाव आहे, त्यामुळे राज्यपालांनीदेखील या परिस्थितीमध्ये त्यांचे योगदान द्यावे, असे ते म्हणाले होते. (हे वाचा- कोरोना लसीकरणात भारताचं मोठं पाऊल; विदेशी कोरोना लशींना मिळणार Fast Track मंजुरी ) राज्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येचा दिवसेंदिवस उच्चांक कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून मंगळवारी अनेक राज्यांमध्ये रुग्णसंख्येची उच्चांकी नोंद झाली आहे. जवळपास पाचपेक्षा अधिक राज्यांमध्ये बाधितांची संख्या वाढलेली दिसून आली. महाराष्ट्रासोबतच आता उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश या मोठ्या राज्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. उत्तर प्रदेशमध्ये उच्चांकी 18 हजार कोरोनाबाधितांची काल नोंद झाली. (हे वाचा- WhatsApp वरूनसुद्धा कोरोना लशीसाठी नोंदणी करता येते का? ) महाराष्ट्रात 15 दिवसांसाठी कलम 144 लागू भयानक पद्धतीनं वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी अखेर महाराष्ट्र सरकारने 15 दिवसांसाठी संचारबंदी लागू केली आहे. आज (बुधवार) संध्याकाळी 8 वाजल्यापासून हे निर्बंध लागू होतील. ‘ब्रेक द चेन’ मोहिमेंतर्गत कोरोना साखळी तोडण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray ) यांनी केले आहे. 1 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केली. या काळात अत्यावश्यक सेवा तसेच सार्वजनिक वाहतूक मात्र सुरू राहणार आहे. कोरोनावरील उपाययोजना आणि टाळेबंदीचा फटका बसणार असलेल्यांना मदत म्हणून 5476 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.