नवी दिल्ली, 4 डिसेंबर : गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू झालेली काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. मागच्या महिन्यात महाराष्ट्रात जोरदार स्वागत करण्यात आले होते. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कडून करण्यात आली होती. या यात्रेला महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद मिळाला.
दरम्यान, आज नवी दिल्ली येथे काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. यात काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी काँग्रेसकडून भारत जोडो यात्रेनंतर हात से हात जोडो अभियान सुरू केलं जाईल, असे जाहीर केले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे देखील हात से हात जोडो अभियानात सहभागी होणार आहेत, अशी माहिजी जयराम रमेश यांनी दिली.
अभियानाला कधी होणार सुरुवात -
हात से हात जोडो अभियान 26 जानेवारीपासून सुरू होणार आहे. हे अभियान तालुका पातळीवर यात्रा, जिल्हा स्तरावर अधिवेशन आणि राज्य पातळीवर मोठ्या यात्रेचं आयोजन, अशा तीन स्वरुपात राबविण्यात येणार आहे.
भारत जोडो यात्रा आज राजस्थानमध्ये -
आज सायंकाळी राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा राजस्थानात प्रवेश करणार आहे. याआधी या भारत जोडो यात्रेला तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तर ही भारत जोडो यात्रा 24 डिसेंबरला दिल्लीत पोहोचणार आहे. तर यानंतर 26 जानेवारीला राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा काश्मिरमध्ये असेल. काँग्रेस त्याच दिवशी नव्या अभियानाची घोषणा करणार आहे. हात से हात जोडो अभियान 26 जानेवारीपासून सुरू होणार आहे.
फेब्रुवारी महिन्यात छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये काँग्रेसचं तीन दिवसांचं अधिवेशन आयोजित करण्यात येणार आहे. यासंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा झाली. फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या या अधिवेशनात तरुणांचे प्रश्न, बेरोजगारी, आर्थिक समस्या यासंदर्भातील प्रस्ताव आणले जाणार आहेत.
राहुल गांधी यांची कन्याकुमारी ते काश्मीर ही भारत जोडो पदयात्रा गेल्या दोन महिन्यांपासून अधिक कालावधीपासून सुरू आहे. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत केवळ पूजा भट्टच नाही तर अनेक सेलेब्रिटी सामील झाले आहेत. अभिनेता अमोल पालेकर, अभिनेत्री रिया सेन, रश्मी देसाई आणि आकांक्षा पुरी यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी भारत जोडो यात्रेला पाठिंबा दिला आहे. चित्रपट कलाकारांच्या उपस्थितीने राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला झळाळी आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bharat Jodo Yatra, Rahul gandhi