नवी दिल्ली, 1 मार्च : राज्यातील काँग्रेसचे (Congress) दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) हे काँग्रेस हायकमांडच्या जवळचे मानले जातात. मात्र राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यांतर पृथ्वीराज चव्हाण यांना कोणतीही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांचे राजकीय वजन कमी झाले की काय अशी चर्चा सुरू असतानाच आता पुन्हा एकदा पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास टाकत आसाम निवडणुकीसाठी (Assam elections) त्यांना मोठी जबाबदारी दिली आहे.
निवडणूक आयोगाने नुकतंच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक तारखांची घोषणा केली. यामध्ये आसामचाही समावेश आहे. आसाम विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने कंबर कसली असून पृथ्वीराज चव्हाण यांच्या उमेदवार निवडणुकीसाठीची समिती अर्थात स्क्रीनिंग कमिटीचं अध्यक्षपद देण्यात आलं आहे. काँग्रेस नेते कमलेश्वर पटेल आणि दीपिका पांडे सिंह या समितीच्या सदस्या असतील.
आसामची निवडणूक 3 टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्याचं मतदान 27 मार्चला होईल. दुसऱ्या टप्प्याचे मतदान 1 एप्रिल तर तिसऱ्या टप्प्याचं मतदान 6 एप्रिलला होईल.
मागील निवडणुकीत काय होतं चित्र?
आसाममध्ये विधानसभेच्या 126 जागांवर निवडणूक होत आहे. 2016 मध्ये 86 जागा जिंकून भारतीय जनता पार्टीने आसाममध्ये आपलं सरकार बनवलं होत. काँग्रेसला 26 जागा आणि AIUDF ला 13 जागा मिळाल्या होत्या. इतरांकडे 1 जागा होती.
हेही वाचा- मनसेनं पोलखोल केल्यानंतर आदित्य ठाकरेंनी दिले कारवाईचे आदेश
दरम्यान, मागील निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवलेलं असल्याने आसाममध्ये पुन्हा काँग्रेसला अच्छे दिन आणण्याचं मोठं आव्हान पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर असणार आहे. हे आव्हान ते कसं पेलतात यावरच काँग्रेस पक्षाची मदार असणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत नेमकं काय घडतं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Assembly Election 2021, Congress, Prithviraj Chavan (Politician), Pruthviraj chauhan