शक्ती सिंह, प्रतिनिधी कोटा, 19 जून : असं म्हणतात की, एखादी गोष्ट मिळवण्याची जिद्द मनात ठेवली आणि ती मिळवण्यासाठी कठोर परिश्रम घेतले की, तिच्यापासून आपल्याला कोणीही दूर ठेऊ शकत नाही. अशीच जिद्द मनाशी बाळगून अनेकजण दिवसरात्र अभ्यास करून मोठमोठ्या पदांवर पोहोचतात. सध्या आपल्याला नीट उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या अशाच प्रेरणादायी कथा ऐकायला मिळत आहेत. राजस्थानच्या चित्तोडगडमधील एका पठ्ठ्यानेही यंदा नीट परीक्षेत बाजी मारली. भारतातून त्याचा 12901वा क्रमांक आला. रामलाल भोई असं त्यांचं नाव. विशेष म्हणजे, वयाच्या बाराव्या वर्षी इयत्ता सहावीत असतानाच रामलाल बोहोल्यावर चढले. लग्न झाल्यावर सगळंकाही संपतं किंवा करिअरच्या बाबतीत तडजोड करावी लागते असा एक समज असतो. रामलाल यांच्याबाबतीतही काहीसं असंच होणार होतं. मात्र त्यांनी परिस्थितीपुढे हार मानली नाही. आपलं शिक्षण सुरूच ठेवलं.
परिस्थिती तशी हलाखीचीच. त्यांचे आई-वडील इतरांच्या शेतात मोलमजुरी करतात. चित्तोडगडच्या घोसुंदा गावातील भेडच नदीकिनारी त्यांचं घर आहे. त्यांची पत्नीही त्यांच्याच वयाची असून प्रथेप्रमाणे त्या लग्नानंतर काही वर्ष माहेरीच राहत होत्या. मागील सहा वर्षांपासून त्या सासरी राहू लागल्या. त्यांचं शिक्षण दहावीपर्यंत झालं. मात्र आपल्या पतीला पुढे शिकायचंय आणि आर्थिक परिस्थिती तितकीशी चांगली नाही, याचा विचार करून त्यांनी आपलं शिक्षण तिथेच थांबवलं. Jalna News : ड्रॅगन फ्रूट शेतीमधून शेतकरी मालामाल, एका एकरातच केली लाखोंची कमाई, Video तर, रामलाल यांच्या दहावीनंतरच्या शिक्षणासाठी त्यांच्या वडिलांचा विरोध होता. मात्र त्यांना अभ्यासाची प्रचंड आवड होती. म्हणूनच त्यांनी घरून पळून जायचं ठरवलं. उदयपूरला येऊन त्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेता. त्यानंतर त्यांच्या वडिलांना मित्राच्या वडिलांनी समजावल्यानंतर त्यांनीही रामलाल यांना शिक्षणासाठी पाठिंबा दिला. मग रामलाल यांनी अतिशय मन लावून अभ्यास करून 2019 साली बारावीच्या बोर्डात 81 टक्के मिळवले आणि नीटसाठी जोरदार तयारी सुरू केली. 4 वेळा अपयश पचवल्यानंतर पाचव्या प्रयत्नात त्यांना यश मिळालं. विशेष म्हणजे 6 महिन्यांपूर्वी त्यांच्या लेकीचा जन्म झाला. त्यामुळे आता त्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे, असं म्हणायला हरकत नाही.