लखेश्वर यादव, प्रतिनिधी जांजगीर चांपा, 23 जुलै : आपल्या कार्यालयात आलेल्या एका वृद्ध महिलेला स्वतः सरकारी गाडीतून घरी घेऊन गेल्याने छत्तीसगडच्या सक्ती जिल्हाधिकारी नुपूर राशी पन्ना यांचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी वृद्ध महिलेच्या कुटुंबियांना समज दिली असून त्यांची व्यवस्थित काळजी घेतली जातेय की नाही याबाबतही देखरेख सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वृद्ध महिलेचा मुलगा जीवनलाल चंद्रा हा त्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाला होता. त्याला जमिनीसंदर्भात तक्रार द्यायची होती. मात्र अचानक तो आईला सोडून तिथून निघून गेला. त्याचं हे कृत्य पाहून आजूबाजूचे लोकही गोंधळात पडले.
मुलगा असा एकटीला सोडून गेला, बराच वेळ परतला नाही. शिवाय जवळ पाणी किंवा काही खायलादेखील नव्हतं. त्यामुळे या महिलेचा जीव अगदी कासावीस झाला. त्या रडू लागल्या. त्यांना असं रडताना पाहून लोकांना फार वाईट वाटलं. पाहता पाहता याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना कळलं. मग त्यांनी स्वतः येऊन आजीबाईंची विचारपूस केली. त्यानंतर त्यांना आपल्या सरकारी गाडीतून सलनी गावात सोडलं. आजीबाईंच्या घरात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबियांना खडसावलं आणि त्यांची व्यवस्थित काळजी घेण्यास सांगितलं. असं पुन्हा होता कामा नये, असा दमही दिला. सीमा हैदर प्रकरणात गुरू रहमान यांचं मोठं वक्तव्य! एका आईला एवढा वेळ मिळतोच कसा? मिळालेल्या माहितीनुसार, जीवनलाल चंद्रा हा जमिनीसंदर्भातील तक्रार घेऊन अनेकदा जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाला होता. मात्र त्याच्या तक्रारीचं निराकरण काही होत नव्हतं. म्हणून यावेळी त्याने आईलाच जिल्हाधिकारी कार्यालयात सोडलं आणि स्वतः घरी निघून गेला. जेणेकरून कोणीतरी दखल घेईल. मात्र त्याची ही युक्ती त्याच्यावरच उलटली. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला खडेबोल सुनावले.