भोपाळ, 27 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या थाटामाटात कुनो राष्ट्रीय उद्यानात आफ्रिकेतून आणलेले चित्ता सोडले होते. याच उद्यानातून एक वाईट बातमी आला आहे. आफ्रिकेतून सप्टेंबरमध्ये आणलेली साशा ही मादी चित्ता आता राहिली नाही. 5 वर्षांच्या साशाचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी आठच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. साशाला किडनीचे संक्रमण झाले होते. त्यानंतर तज्ज्ञांची टीम सतत तिची काळजी घेत होते. मात्र, यांच्या प्रयत्नांना अपयश आले.
नामिबियातून आणलेले सर्व चित्ते नुकतेच मोकळ्या जंगलात सोडण्यात आले. पण 22 मार्च रोजी साशाची तब्येत बिघडल्याने तिला रेस्क्यू करुन डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. डॉक्टरांचे पथक तिच्यावर सतत लक्ष ठेवून होते. पण किडनीच्या आजाराने त्रस्त साशाला वाचवता आले नाही. तिचा आज सकाळी उद्यानात मृत्यू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर रोजी त्यांच्या वाढदिवसादिवशी साशासह इतर 8 चित्त्यांना या जंगलात सोडले होते.
पीसीसीएफने केलं स्पष्ट
अलीकडेच दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्त्यांची दुसरी तुकडी मागवण्यात आली होती. पण पहिल्या बॅचमध्ये कुनोत आलेली साशा जास्त दिवस जगू शकली नाही. वन्यजीव पीसीसीएफचे जेएस चौहान यांच्या म्हणण्यानुसार, साशा नामिबियातूनच किडनीच्या आजाराने त्रस्त होती. तिच्या देहबोलीतही बदल दिसत होता. डॉक्टरांच्या अथक परिश्रमानंतरही तिला वाचवता आले नाही. किडनीच्या आजारानेच तिचा मृत्यू झाल्याचे पोस्टमॉर्टम अहवालातही स्पष्ट झालं आहे.
वाचा - राहुल गांधींना लागोपाठ दुसरा धक्का! खासदारकी गेल्यानंतर आता गृहनिर्माण समितीची नोटीस
आता 19 चित्ते शिल्लक
साशाच्या मृत्यूनंतर आता कुनोमधील चित्त्यांची संख्या 19 वर आली आहे. 17 सप्टेंबर रोजी कुनो येथे 8 चित्त्यांना सोडण्यात आलं होतं. यानंतर दक्षिण आफ्रिकेतून आणखी 12 चित्ते आणण्यात आले. केंद्रीय मंत्री भूपेंद्र सिंह यादव यांच्या उपस्थितीत 18 फेब्रुवारी रोजी कुनो येथे सीएम शिवराज यांनी त्यांना सोडले होते. मादी चित्ताच्या मृत्यूनंतर उर्वरित चित्त्यांची सुरक्षा वाढवण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे. सायंकाळी मंत्री विजय शहा यांनी मंत्रालयात अधिकाऱ्यांची बैठक बोलावून उर्वरित चित्त्यांच्या देखभाल व संरक्षणाबाबत चर्चा केली.
भारतात येण्यापूर्वीच किडनी खराब होती
वन विभागाने जारी केलेल्या अहवालानुसार साशाला उपचारासाठी क्वारंटाईन एन्क्लोजरमध्ये ठेवण्यात आले होते. यादरम्यान, साशाच्या रक्ताचा नमुना देखील घेण्यात आला, ज्याची आधुनिक मशीनद्वारे चाचणी करण्यात आली. रक्ताचे नमुने तपासले असता किडनीमध्ये संसर्ग आढळून आला. यानंतर डॉक्टरांची टीम कुनो पालपूरमध्ये साशावर नजर ठेवून होती. वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया डेहराडून आणि कुनो नॅशनल पार्क मॅनेजमेंट आणि चीता कंझर्वेशन फाऊंडेशन नामिबियाच्या शास्त्रज्ञांनी साशाच्या उपचाराचा इतिहास पाहिला. यावरून असे दिसून येते की 15 ऑगस्ट 2022 रोजी नामिबियामध्ये घेतलेल्या शेवटच्या रक्त नमुन्यात क्रिएटिनिन पातळी 400 पेक्षा जास्त असल्याचे आढळले. यावरून साशाला भारतात येण्यापूर्वी किडनीचा आजार असल्याची स्पष्ट झाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Narendra Modi, PM Modi