नवी दिल्ली, 27 मार्च : खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आणखी एक धक्का बसला आहे. लोकसभा सदस्यत्वासाठी अपात्र ठरलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांना 22 एप्रिलपर्यंत अधिकृत बंगला रिकामा करण्यास सांगण्यात आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधींना 12 तुघलक रोड येथील बंगला रिकामा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. लोकसभेच्या गृहनिर्माण समितीने सोमवारी काँग्रेस नेते आणि वायनाडचे माजी खासदार राहुल गांधी यांना सरकारी बंगला रिकामा करण्यासाठी नोटीस बजावली. वायनाडच्या खासदाराचे संसद सदस्यत्व रद्द केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. सध्या राहुल गांधी 12 तुघलक रोड येथील सरकारी बंगल्यात राहतात. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने 2019 च्या मानहानीच्या खटल्यात 24 मार्च रोजी लोकसभेतून अपात्र ठरवले होते. सुरत न्यायालयाने राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अपात्र सदस्याला त्याचे सदस्यत्व गमावल्यानंतर एका महिन्याच्या आत सरकारी बंगला रिकामा करावा लागतो. आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, राहुल गांधी गृहनिर्माण समितीला हा कालावधी वाढवण्याची विनंती करू शकतात. लोकसभा सचिवालयाने राहुल यांना अपात्र ठरवलेल्या अधिसूचनेची प्रत एनडीएमसीच्या संपदा महासंचालनालयासह विविध विभागांना पाठवण्यात आली होती. वाचा - BREAKING : छगन भुजबळ यांची प्रकृती बिघडली, वाटेतच हॉस्पिटलमध्ये पोहोचले राहुल यांच्यावरील कारवाईचा विरोधकांकडून निषेध दुसरीकडे, काँग्रेस आणि इतर अनेक विरोधी पक्षांच्या खासदारांनी सोमवारी लोकसभेतून राहुल गांधी यांना अपात्र ठरवल्याच्या विरोधात निदर्शने केली आणि अदानी समूहाशी संबंधित प्रकरणात संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) स्थापन करण्याची मागणी केली. काँग्रेस आणि इतर काही मित्रपक्षांच्या खासदारांनी काळे कपडे परिधान करून राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईचा निषेध केला.
विरोधी पक्षनेत्यांनी आधी संसदेच्या संकुलात ठिय्या मांडला आणि नंतर विजय चौकापर्यंत मोर्चा काढला. संसद भवन संकुलातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर देण्यात आलेल्या या धरणे आंदोलनात काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे अनेक खासदार, द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) केटीआर बाळू, क्रांतिकारी समाजवादी पक्षाचे (आरएसपी) के एनके प्रेमचंद्रन आणि इतर काही नेते उपस्थित होते.

)







