विक्रम कुमार झा, प्रतिनिधी पूर्णिया, 26 जुलै : पाळीव प्राण्यांचा वाढदिवस साजरा केला जातो, त्यांना शॉपिंगला सोबत नेलं जातं, त्यांचे सगळे हट्ट, लाड पुरवले जातात. मात्र तुम्ही कधी पाळीव प्राण्यांसाठी न्यायालयात हक्क मागायला गेल्याचं ऐकलंय का? असं घडलंय बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात. आपला जीव वाचवण्यासाठी विजेच्या तारेला स्पर्श करून मांजरीने स्वतःचा जीव दिला म्हणून तिला न्याय मिळवून देण्यासाठी एक महिला न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. पूर्णियाच्या राणीपतरा भागात राहणाऱ्या निवृत्त शिक्षिका अर्चना देव यांच्या मांजरीचा विद्युत तारेच्या संपर्कात येऊन मृत्यू झाला. त्यांनी याबाबत विद्युत वितरण विभागाकडे रीतसर लेखी तक्रार केली, मात्र विभागाकडून काहीच प्रत्युत्तर आलं नाही. त्यामुळे आता न्यायालयात जाणार, असं त्यांनी म्हटलं आहे.
साल 1998पासून त्यांनी आपल्या घरात कुत्रे आणि मांजरी अगदी कुटुंबातील सदस्यांसारखे सांभाळले आहेत. या प्राण्यांचा दिवसही अर्चना यांच्यासोबत सुरू होतो आणि रात्रही त्यांच्यासोबतच होते. त्या आपल्या प्राण्यांना अक्षरशः दैवत मानतात. त्या म्हणतात, मांजर, कुत्रा हे इतरांसाठी प्राणी असतील पण माझ्यासाठी देवासमान आहेत. प्रेमाखातर केले सात समुद्र पार! सीमाचीच नाही ‘यांची’ही लव्हस्टोरी आहे एकदम खास अर्चना यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळच्या वेळी त्यांच्या घराच्या अंगणात विद्युत तार पडली होती. अचानक त्यांना कोणीतरी आवाज दिला म्हणून त्या घराबाहेर यायला निघाल्या. त्या बाहेर पडणारच होत्या, तर त्यांची मांजर मध्ये आली आणि तिला विद्युत तारेचा स्पर्श झाला. स्पर्श होताच मांजरीचा मृत्यू झाला. मांजर मध्ये आली नसती, तर अर्चना यांच्या जीवाला मोठा धोका होता. त्यावेळी मांजरीच्या रूपात साक्षात देवाने आपला जीव वाचवला असं म्हणत अर्चना यांनी हंबरडा फोडला. अर्चना देव यांनी विद्युत वितरण विभागाकडे घडलेल्या घटनेबाबत तक्रार देऊन आपण घटनास्थळी येऊन तपासणी करावी, अशी मागणी केली आहे. मात्र विभागाकडून त्यांच्या तक्रारीला कोणतंही उत्तर मिळालेलं नसून कोणी अधिकारीही तपासणीसाठी आलेले नाहीत. त्यामुळे अर्चना देव यांनी ‘माझी मांजर माझ्या घरातली एक सदस्य होती. तिला विभागाकडून न्याय मिळाला नाही, तर मी न्यायालयात जाईन’, असं म्हटलं आहे.