जयपूर, 4 ऑगस्ट : शेतात जाऊन गाण्याच्या स्वरूपात इंद्रदेवाला साकडं घातलं की पाऊस (Rains) पडतो, अशी राजस्थानमधील (Rajasthan) अनेकांची श्रद्धा (Belief) आहे. या परंपरेनुसार राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील (Nagour district) नागरिक मेघ मल्हार रागात 'तेजा गायन' करतात. या तेजा गायनामुळे पाऊस पडतो, असं मानलं जातं. ‘तेजा गायन’ करून पाऊस पाडण्याच्या राजस्थानमधील या प्रथेचा केंब्रिज विद्यापीठाच्या (Cambridge university) अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.
काय आहे प्रथा?
मेघमल्हार रागाचा पावसाशी संबंध असल्याचं सांगितलं जातं. या रागावर आधारित तेजा गायन हा प्रकार राजस्थानमधील विविध भागात पाहायला मिळतो. गावातील अनेक नागरिक शेतात जाऊन इंद्रदेवाला गाण्याच्या माध्यमातून साकडं घालतात. या प्रथेवर लोकांचा इतका विश्वास आहे, की घरातून निघताना लोक छत्री घेऊन जातात. गेल्या अनेक वर्षांपासून ही प्रथा सुरु असून त्यावर वेगवेगळ्या अभ्यासकांनी रिसर्चही केला आहे. या प्रथेवर 11 वर्षांपूर्वी एक पुस्तक लिहिण्यात आलं होतं. हे पुस्तक आता केंब्रिज विद्यापीठात पोहोचलं आहे.
नेमका कशाचा अभ्यास?
जगभरातील विविध लोककला आणि प्रथा या विषयांच्या अभ्यासक्रमात या पुस्तकातील काही संदर्भ देण्यात आले आहेत. भारत हा हजारो वर्षांची संस्कृती असणारा देश असल्यामुळे अशा अनेक प्रथा आणि परंपरा भारतात आहेत. त्यातील बहुतांश प्रथांचा संबंध हा निसर्गाशी असून ती प्रथा सुरु होण्याच्या कारणांचा शोध घेतला असता, मानव आणि निसर्गातील नातं प्रस्थापित करण्याचा प्रयत्न त्यातून दिसून येत असल्याचं अभ्यासक सांगतात.
हे वाचा -ऑलिम्पिकपटू प्रवीण जाधवच्या कुटुंबीयांचा घरासाठी सुरू असणारा वाद अखेर मिटला
दहाव्या शतकापासून ही प्रथा सुरु असून गेल्या काही वर्षांमध्ये त्यात कालानुरुप बदल झाल्याचंही सांगितलं आहे. मात्र या प्रथेचं मूळ तत्त्व तेच असून पावसाची आराधना करण्यासाठी भारतात दिसणाऱ्या अनेक प्रथांपैकी ही एक महत्त्वाची आणि जुनी प्रथा मानली जाते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.