विक्रम कुमार झा, प्रतिनिधी पुर्णिया, 20 जून : कुटुंबियांचा, समाजाचा विरोध पत्करून पळून जाऊन लग्न करणं हे आता काही नवं राहिलेलं नाही. अशी प्रकरणं वारंवार घडू नये यासाठी समाजाकडूनही हळूहळू पूर्णपणे प्रेमविवाह स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. परंतु लग्नाआधीचे विधी एकासोबत पार पाडून दुसऱ्यासोबत पळून जाऊन लग्न करणं हे समाजाला मान्य नाही. अशाच एका घटनेतून बिहारमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. ठरलेल्या लग्नातून पळून गेलेल्या स्वीटी नामक तरुणीची अंत्ययात्रा काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या जिवंत तरुणीचा पुतळा बनवून त्यावर तिचा फोटो लावून राम नाम सत्य है म्हणत गावभर अंत्ययात्रा काढण्यात आली आणि शेवटी गावकऱ्यांच्याच साथीने तिच्या पुतळ्यावर अंत्यसंस्कार झाले. यात स्वीटीचा गुन्हा एवढाच की, तिने प्रेम केलं.
स्वीटी ही बारावीत शिकणारी तरुणी सुधांशु या तरुणाच्या प्रेमात पडली होती. त्याचंही तिच्यावर जीवापाड प्रेम होतं. मात्र स्वीटीच्या कुटुंबियांनी तिचं इतर ठिकाणी पारंपरिक पद्धतीने लग्न ठरवलं. लाख प्रयत्न करूनही स्वीटीला या लग्नातून स्वतःची सुटका करून घेता येत नव्हती. पाहता पाहता लग्नघटिका समीप आली. तिच्या अंगाला हळद लागली. मात्र इतर कोणासोबत बोहोल्यावर चढणं तिला मान्यच नव्हतं. म्हणून कसंबसं धाडस करून लग्नाच्या एका दिवसाआधी ती प्रियकरासोबत पळून गेली. स्वीटी पळाल्याचं कळताच तिच्या घरात जणू हाहा:कार माजला. कुटुंबियांनी तिला शोधण्याआधी संपूर्ण गाव गोळा केला आणि स्वीटी आजपासून आमच्यासाठी मेली, अशी घोषणाच करून टाकली. त्यानंतर गावकऱ्यांच्या साथीने स्वीटीची जिवंतपणी अंत्ययात्रा काढण्यात आली. Bank Holiday in July 2023: जुलैत फक्त 15 दिवसच चालू राहणार बँका, पाहा हॉलिडे लिस्ट! जिल्ह्यात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यावर काहीजणांनी स्वीटीला शिव्या देऊन घरच्यांनी जे केलं ते योग्यच आहे असं म्हटलं. तर, काहीजणांनी हे चुकीचं असल्याचं सांगितलं. स्वीटीचा भाऊ बिहारी गुप्ता याने आम्ही हे समाजाला आरसा दाखवण्यासाठी केलं असल्याचं म्हटलं. ‘प्रत्येक मुलीने असं पाऊल उचलताना निदान एकदा तिच्या कुटुंबाचा आणि समाजाचा विचार करायला हवा. त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसणार नाही, असं कृत्य कोणत्याही मुलीने करायला नको, यासाठी आम्ही ही अंत्ययात्रा काढली आहे’, असं तो म्हणाला.