कोलकाता, 29 मार्च : पश्चिम बंगालमधील भाजप कार्यकर्ते गोपाल मजूमदार यांच्या 85 वर्षीय आई शोवा मजूमदार यांचं सोमवारी निधन झालं. त्या जवळपास गेल्या एक महिन्यापासून रुग्णालयात दाखल होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर भाजप आणि टीएमसीमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजप त्यांच्या मृत्यूसाठी टीएमसी कार्यकर्त्यांना जबाबदार धरत असून, दुसरीकडे टीएमसी भाजप राजकारण करत असल्याचा आरोप करत आहे.
भाजप कार्यकर्ते गोपाल मजूमदार यांच्या आईच्या निधनानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत, त्यांच्या मृत्यूसाठी टीएमसी कार्यकर्त्यांना जबाबदार ठरवलं आहे. 'बंगालच्या लेकीच्या निधनाने अतिशय दु:ख झालं. टीएमसीच्या गुंडांनी त्यांना मारहाण केली. मजूमदार कुटुंबियांचं हे दु:ख ममता दिदींना अनेक काळ त्रास देत राहिल. बंगाल हिंसामुक्तीसाठी लढेल, जेणेकरुन आमच्या आई आणि बहिणींना सुरक्षित भविष्य मिळू शकेल.' अशी प्रतिक्रिया अमित शाह यांनी दिली आहे.
दरम्यान, टीएमसीचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी शोवा मजूमदार यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत पोलीस चौकशी करत असून गृहमंत्र्यांनी दिलेली ही प्रतिक्रिया योग्य नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राम येथे रोड शोदरम्यान अमित शाहांना प्रत्युत्तर दिलं आहे. शोवा मजूमदार यांचं निधन कसं झालं हे माहित नाही. आमचा पक्ष महिलांविरुद्धच्या हिंसेला पाठिंबा देत नाही. बंगालची स्थिती किती खराब झाली असा सवाल शाह करतात, परंतु उत्तर प्रदेशची स्थिती कशी आहे? असा माझा सवाल आहे. त्यांनी सांगावं की हाथरसमध्ये काय झालं होतं? असा सवाल करत ममता बॅनर्जी यांनी अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.
काय आहे प्रकरण -
भाजप कार्यकर्ते गोपाल मजूमदार यांच्या आई शोवा मजूमदारांवर 3 लोकांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात त्या अतिशय गंभीर जखमी झाल्या होत्या. गेल्या एक महिन्यापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. भाजपने टीएमसी कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप केला होता. भाजपने शोवा मजूमदार यांच्या फोटोचा ममता बॅनर्जींविरोधात पोस्टर वॉरमध्येही वापर केला होता.
शोवा मजूमदार यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. व्हिडीओमध्ये त्यांनी आपलं दु:ख व्यक्त केलं होतं. मारहाण झाल्यानंतर त्यांना नीट बोलता येत नाही, की बसता येत नसल्याचं त्यांनी व्हिडीओत सांगितंल होतं. दोघांनी त्यांना धक्का दिला, हल्ला करणारे 3 ते 4 जण होते, त्यांनी चेहरा झाकला असल्याचंही शोवा यांनी व्हिडीओत सांगितलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.