पुणे, 29 मार्च : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातली वनडे सीरिज संपल्यानंतर दोन्ही देशांचे खेळाडू आयपीएल (IPL 2021) खेळण्यासाठी त्यांच्या टीममध्ये सामील होत आहेत. कोरोना व्हायरसमुळे हे खेळाडू चार्टर विमानाने एका बायो-बबलमधून दुसऱ्या बायो-बबलमध्ये जात आहेत. भारत-इंग्लंड सीरिजमध्ये मॅच रेफ्री असलेले जवागल श्रीनाथ (Javagal Srinath) यांनी मात्र प्रवासी विमानाने प्रवास केला आहे. या प्रवासादरम्यान त्यांना वेगळाच अनुभव आला.
इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमध्ये जवागल श्रीनाथ मॅच रेफ्री होते. पुण्यातली ही मॅच संपल्यानंतर पुण्याच्या विमानतळावरून श्रीनाथ निघाले. यावेळी विमानात त्यांच्या बाजूला काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉक्टर शमा मोहम्मद (Shama Mohammad) बसल्या होत्या, पण त्यांनी श्रीनाथ यांना ओळखलंच नाही. शमा मोहम्मद यांनी हा अनुभव सोशल मीडियावर शेयर केला आहे.
I was in conversation with this gentleman in the last hour of the flight with masks on.Finally I asked him his name & he said Srinath ,then asked him “what to do you do” & he said I am into cricket - that’s when it struck me who he is! With masks on,no one recognizes the other 😀 pic.twitter.com/es8NdUF6fW
— Dr. Shama Mohamed (@drshamamohd) March 29, 2021
'या सदगृहस्थांसोबत मास्क लावून प्रवास करत होते, त्यावेळी त्यांना नाव विचारलं. माझं नाव श्रीनाथ असल्याचं त्यांनी सांगितलं. तुम्ही काय करता असं विचारलं असात त्यांनी क्रिकेट असं उत्तर दिलं, त्यावेळी हे नक्की कोण ते मला कळलं. मास्क असताना तुम्ही दुसऱ्यांना ओळखू शकत नाही,' असं ट्वीट शमा मोहम्मद यांनी केलं.
2003 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर श्रीनाथ यांनी आयसीसीच्या मॅच रेफ्री पदाची जबाबदारी स्वीकारली. तेव्हापासून जगाच्या कानाकोपऱ्यात श्रीनाथ मॅच रेफ्री म्हणून आयसीसीचं प्रतिनिधीत्व करतात. भारताकडून खेळताना श्रीनाथ यांनी 67 टेस्टमध्ये 236 विकेट घेतल्या, तर 229 वनडेमध्ये त्यांना 315 विकेट मिळाल्या. 2003 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचनंतर श्रीनाथ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले नाहीत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, India vs england