मुंबई, 08 नोव्हेंबर : या जगात असलेल्या अनेक गूढ गोष्टींचं रहस्य अजूनही मानवाला समजलेलं नाही. विज्ञानाच्या मदतीनं अंतराळात जाऊन ते विश्व मानव उलगडत आहे, तसंच समुद्राच्या तळाशी असलेलं विश्वही समजून घेण्याचा माणसाचा प्रयत्न सुरू आहे. अलीकडेच ऑस्ट्रेलियात समुद्रतळावर घेण्यात आलेल्या शोधात बरीच नवी माहिती संशोधकांना मिळाली. त्यात समुद्रातले पर्वत, ज्वालामुखी व वेगवेगळ्या समुद्री जीवांबाबतची माहिती संशोधकांना मिळाली. याआधी अशा प्रकारचे प्राणी समुद्रात कधीही दिसले नव्हते.
ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम किनाऱ्यापासून 2,500 किलोमीटर अंतरावर दोन नवीन मरीन पार्क आहेत. या पार्कमध्ये सागरतळाशी तपासणी केल्यावर संशोधकांना तिथून वेगळे सागरी जीव मिळाले आहेत. 30 सप्टेंबरला ही शोधमोहीम संपली. डायनोसॉर युगामध्ये या भागात अनेक सागरी पर्वत होते. प्रशांत आणि हिंदी महासागरातल्या मोक्याच्या ठिकाणी हे ठिकाण आहे. या ठिकाणी मिळालेल्या वेगवेगळ्या सागरी जिवांमुळे आम्ही खूप खूश आहोत, असं म्युझियम व्हिक्टोरियामध्ये सागरी जीवांबाबत अभ्यास असणारे सीनिअर क्युरेटर टीम ओहारा यांना वाटतं. नवीन मरीन मार्कचा भाग असणाऱ्या कोकोस किलिंग (Cocos Keeling) आणि ख्रिसमस आयलंडच्या (Christmas Islands) जवळच्या 7,40,000 चौरस किलोमीटरच्या भागात संशोधकांना वेगवेगळे मासे आणि इतर सागरी जीव सापडले आहेत. त्यात पंख असणारे मासे होते, ते हवेत उडण्याचा प्रयत्न करत होते. या जिवांना सागरी पक्ष्यांकडून धोका असल्याचं ऑस्ट्रेलियन म्युझियम रिसर्च इन्स्टिट्यूटचे फिश बायोलॉजिस्ट यी काई टी यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा - म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या ‘या’ 5 गोष्टी; नाहीतर...
या शोधमोहिमेत संशोधकांनी 13 हजार किलोमीटरचा प्रवास 35 दिवसांत केला. यात समुद्राच्या तळाचं मॅपिंगही करण्यात आलं. त्यात प्राचीन सागरी पर्वत, ज्वालामुखी, दऱ्या, पर्वतरांगा दिसल्या. ते ज्वालामुखी 14 ते 0.5 कोटी वर्षांपूर्वी तयार झालेले आहेत. या मॅपिंगवरून कोकोस आयलंड हे एका महाकाय सागरी पर्वताचे दोन कळस असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. ते समुद्राच्या तळापासून जवळपास 5 हजार मीटर लांब आहेत. पाण्यात असलेलं पर्वताचं तिसरं टोकही त्यांना मिळालं. ते सागरी तळापासून 350 मीटर खाली आहे.
या संशोधनासाठी त्यांनी समुद्रात 5,500 मीटर खोलपर्यंत जाळं टाकलं होतं. त्यात त्यांना सागरी जिवांचा खजिनाच सापडला आहे. त्यातल्या एक तृतीयांश प्रजाती विज्ञानाच्या दृष्टीनं नव्या असू शकतील. यात नव्या प्रकारचा ब्लाइंड कस्क इल (Blind Cusk Eel) हा मासा त्यांना सापडला. त्या माशाची त्वचा चिकट, सैल आणि पारदर्शक होती. या माशांचे डोळे छोटेसे आणि सोनेरी खड्ड्यांसारखे आहेत. त्यांची त्वचा खूप चिकट, सैल असून हे मासे दुर्मीळ आहेत, असं एमव्हीचे सीनिअर कलेक्शन मॅनेजर डायने ब्रे यांनी सांगितलं.
संशोधकांना एक बॅटफिशही मिळाला आहे. ती रॅविओलीसारखी गोड दिसते. या माशाचे मागचे पंख पायांसारखे दिसतात. त्याच्या साह्यानं हे मासे सागरी तळाशी तरंगतात. संशोधकांना यात ट्रायपॉडप्रमाणे पाय समुद्रतळावर रोवून बसलेला एक मासाही दिसला. त्याचे पंख लांब असून नांगराप्रमाणे तो पाय तळाला रोवतो. यामुळे शिकार करणं सहज शक्य होऊ शकतं. या माशाला ट्रायपॉड मासा असंच नाव देण्यात आलंय. या खजिन्यामध्ये संशोधकांना हरमिट क्रॅब मिळाला आहे. मऊ प्रवाळांचा उपयोग तो आवरण म्हणून करतो. त्याशिवाय अनेक सी कुकुंबर, सी स्टार, शंख मिळाले आहेत.
संशोधक या सागरी जिवांचा अभ्यास करणार आहेत. त्यानंतर त्यांना विविध प्रजातींच्या गटात समाविष्ट केलं जाईल. सागरीतळाशी असलेल्या अनेकविध जिवांपैकी काहींचा शोध सध्या संशोधकांना लागला आहे, मात्र अद्यापही अनेक गोष्टींचं रहस्य उलगडलेलं नाही.
bizar creatures, bottom of sea, researchers, सागरी जीव, सागरतळ, ऑस्ट्रेलिया
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.