मुंबई, 10 ऑक्टोबर : निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे राज्यातले वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेनेनं आता दिल्ली हायकोर्टामध्ये धाव घेतली आहे. दिल्ली हायकोर्टामध्ये निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले आहे.
शिवसेनेचे पक्षचिन्ह असलेले धनुष्यबाण निवडणूक आयोगाने गोठावण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे शिवसेनेला जबर धक्का बसला आहे. कालपर्यंत सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली होती. पण अखेरीस आता दिल्ली हायकोर्टामध्ये सिवसेनेनं याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज किंवा उद्या सुनावणी होणार असल्याची माहिती शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांनी दिली.
निवडणूक आयोगानं अंतिरम आदेश पारित केला आहे. आम्ही त्यादृष्टीने चिन्ह दिले आहे. आम्ही दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. नैसर्गिक न्यायात बाधा येणार असल्याचं आम्हाला दिसतंय. केंद्रीय निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहे. शनिवारी पत्र पाठवले आणि लगेच निर्णय घेतला, असा आरोप अनिल देसाई यांनी केला.
(संकटकाळी राज ठाकरे मोठ्या भावाची साथ देणार? एका ट्विटने चर्चांना उधाण)
आयोगानं सुनावणी घ्यायला पाहिजे होती, आम्हाला अवधी द्यायला पाहिजे होता. एकतर्फी निर्णय आयोगानं घेतला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं घाईनं निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने या गोष्टी लक्षात घ्यायला हव्या होत्या. दिल्ली हायकोर्टासमोर अनेक मुद्दे मांडले आहेत, अशी माहितीही देसाई यांनी दिली.
पक्षाची घटना , पदाधिकारी सर्व गोष्टी आम्ही नमूद केल्या आहेत. यावर कोर्टात सखोल विचार होईल. फ्री चिन्हात राष्ट्रयत्व संदर्भात आक्षेप नसेल तर चिन्ह दिलं जाऊ शकत त्यामुळे आम्ही त्रिशूळला प्राधान्य दिले आहे, अशी माहिती अनिल देसाई यांनी दिली.
('56 वर्षात कोणालाही जमलं नाही ते एकनाथ शिंदेंनी करून दाखवलं', सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा 'बाण')
दरम्यान, निवडणूक आयोगाला त्रिशूळ, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल हे चिन्हांचे तीन पर्याय आपण निवडणूक आयोगाला दिले असल्याचं उद्धव ठाकरे फेसबूक लाईव्हमध्ये म्हणाले. तात्पुरत्या वेळेसाठी आपण निवडणूक आयोगाला दिली आहेत. यातलं एक नाव शिवसेना बाळासाहेब ठाकरे, दुसरं नाव शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
तर, केंद्रीय निवडणूक आयोगासमोर शिंदे गटाची भूमिका ठरवण्यासाठी रविवारी रात्री वर्षा बंगल्यावर बैठक झाली. निवडणूक चिन्हासाठी तलवार, तुतारी आणि गदा या चिन्हांचा विचार सुरू असून, त्यावर लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या बैठकीला शिंदे गटातील सर्व मंत्री, खासदार, आमदार यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. निवडणूक आयोगाचा हा निकाल अंधेरी पोटनिवडणुकीकरीता असल्याने त्यानंतर ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह आपल्यालाच मिळेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.