नवी दिल्ली 25 मार्च : मोदी आडनावारून केलेल्या वक्तव्यासंदर्भात सुरत न्यायालयाने काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर शुक्रवारी (24 मार्च 2023) राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. यावरून आता देशातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशा प्रकारे खासदारकी रद्द करण्यात आलेले राहुल गांधी हे पहिलेच खासदार नाहीत. यापूर्वीही जवळपास 200 खासदार-आमदारांवर अशी कारवाई करण्यात आली आहे.
‘आज तक’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. आतापर्यंत 200 खासदार-आमदारांना विविध कारणांमुळे अपात्र ठरवण्यात आलं आहे. या कारणांमध्ये पक्षांतर, भ्रष्टाचार, बलात्कार, भावना भडकावणारं भाषण, घोषित उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा जास्त मालमत्ता, निवडणूक नियमांचं उल्लंघन, लाभाचं पद, पोलिसांवर हल्ला, खोटी जन्मतारीख, बनावट मार्कशीट, दंगलीत सहभाग, खून किंवा खुनाचा प्रयत्न यांसारख्या गुन्ह्यांमध्ये आरोपी, तस्करी आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हे आदींचा समावेश आहे.
'तेव्हा' माफी मागितली असती तर आज.., राहुल गांधी प्रकरणात राऊतांचा मोठा गौप्यस्फोट!
अपात्र ठरवण्यात आलेल्या खासदारांमध्ये सर्वांत पहिला क्रमांक लागतो मिझोराममधले काँग्रेस खासदार लाल दुहोमा यांचा. पक्षांतरविरोधी कायद्याचं उल्लंघन केल्याबद्दल त्यांना 1988मध्ये अपात्र ठरवण्यात आलं होतं. लाल दुहोमा हे आयपीएस अधिकारी होते आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळत होते. 1984मध्ये ते काँग्रेसकडून उभे राहिले आणि बिनविरोध लोकसभा खासदार झाले; पण 1988मध्ये त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्यानं त्यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलं होतं.
लोकसभा सदस्यत्व रद्द झालेले राहुल गांधी हे गांधी-नेहरू कुटुंबातले तिसरे सदस्य आहेत. इंदिरा गांधी आणि सोनिया गांधी यांच्यानंतर आता राहुल गांधींवर अशी कारवाई झालीय. अलीकडच्या दशकात अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. चारा घोटाळ्यात लालू प्रसाद यादव, बेहिशेबी मालमत्तेसाठी जयललिता, भावना भडकावणारं भाषण केल्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे नेते आझम खान, बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरणात त्यांचा मुलगा अब्दुल्ला आझम, बलात्कार प्रकरणात भाजप आमदार कुलदीपसिंह सेंगर, भ्रष्टाचार प्रकरणात काँग्रेसचे राज्यसभा खासदार रशीद मसूद आदीं अपात्र ठरलेल्यांच्या यादीमध्ये समावेश आहे.
अशा प्रकारच्या कारवाईचा फटका जवळपास सर्वच लोकप्रिय राजकीय पक्षांचे नेते व आमदार यांना बसला आहे. त्यामध्ये काँग्रेस, भाजप, समाजवादी पार्टी, सीपीएम, जेएमएम, कर्नाटकातले अपक्ष आमदार वाटल नागराज, आरजेडी, एआयएडीएमके आणि मुस्लिम लीग आदींचा समावेश आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यामुळे पुन्हा एकदा याबद्दल चर्चा सुरू झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: PM Modi, Political leaders, Rahul gandhi