जयपूर, 28 एप्रिल : राजस्थानमधून (Rajasthan) एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात सध्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गहलोत (Ashok Gehlot) यांच्या नेतृत्वात सरकार आहे. पण या सरकारला सुरुंग लागण्याची भीती वर्तवली जात आहे. कारण काँग्रेसमधील (Congress) अंतर्गत कलह शिगेला पोहोचला आहे. राजस्थानातील काँग्रेसचा तरुण चेहरा अशी ख्याती असलेले सचिन पायलट (Sachin Pilot) यांना मुख्यमंत्रीपदाची धुरा हवी आहे. त्यासाठी त्यांनी याआधीदेखील बंड पुकारलं होतं. त्यानंतर त्यांनी आता पुन्हा तसंच काहीसं करण्याचं ठरवल्याची चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे सचिन पायलट यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi), महासचिव प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासोबत गेल्या काही दिवसांमध्ये तीन बैठका घेतल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकांमध्ये त्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबतची आपली भूमिका स्पष्ट सांगितली आहे. पक्षाने मला तातडीने मुख्यमंत्री बनवावं. नाहीतर आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पंजाबसारखाच राजस्थानमध्येही पराभव होईल, असं सचिन पायलट यांनी काँग्रेस हायकमांडला (Congress High Command) सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राजस्थानात डिसेंबर 2023 मध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे सचिन पायलट यांना उरलेल्या एक वर्षासाठी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी हवी आहे. पायलट यांनी दोन वर्षांपूर्वी देखील मुख्यमंत्रीपदाबाबत दावा केला होता. त्यासाठी त्यांना 18 आमदारांचा पाठिंबा मिळाला होता. तर दुसरीकडे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना इतर काँग्रेस आमदारांना घेऊन एका रिसॉर्टमध्ये थांबावं लागलं होतं. ( सरकारवर समाजाचा दबाव असेल तर.., मोहन भागवतांचं मोठं विधान ) सचिन पायलट हे एकेकाळी राजस्थानचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यांच्यावर पक्षाचा प्रचंड विश्वास होता. त्यामुळे 2018 च्या विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाने त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपविली होती. राज्यातील काँग्रेसचे बडे नेते पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपात जात असताना हा नेता पक्षात तग धरुन उभा राहिला होता. त्यांनी पक्ष वाढविण्यासाठी बरेच प्रयत्न केले. पण तरीही ज्योतिरादित्य शिंदे, जितिन प्रसाद आणि आरपीएन सिंह सारख्या बड्या नेत्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. या सगळ्या घडामोडी एकीकडे घडत असताना सचिन पायलट यांनी 2020 मध्ये मुख्यमंत्रीपदाचा दावा केला होता. आपल्याला मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळावी, अशी मागणी त्यांनी काँग्रेस हायकमांडकडे केली होती. त्यावेळी त्यांना 18 आमदारांनी पाठिंबा दिला होता. बऱ्याच नाट्यमय घडामोडींनंतर पक्षश्रेष्ठींना त्यांची मनधरणी करण्यात यश आलं होतं. त्यानंतर सचिन पायलट यांनी आता पुन्हा मुख्यमंत्रीपदाबाबत मोठा दावा केला होता. पंजाबचा फॉर्म्युला राजस्थानातही वापरणार? पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने बाकी असताना काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बदलला होता. तत्कालीन मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर चरणजीत सिंह चन्नी यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. पण काँग्रेसचा तो प्रयत्न फसला होता. त्याच प्रयोगाचा दाखल देत सचिन पायलट यांनी काँग्रेस हायकमांडला इशारा दिला आहे. आता काँग्रेस हायकमांड सचिन पायलट यांची मागणी मान्य करते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.