नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर : अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला उद्देशून भाषण केलं. या निकालामुळे आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. भारत हा जगातला सर्वात मोठा लोकशाही देश आहे, इथली लोकशाही जिवंत आणि मजबूत आहे हेच यावरून दिसलं, असं पंतप्रधान म्हणाले. देशानं खुल्या मनाने हा निर्णय स्वीकारला हेही त्यांनी सांगितलं. या वादावरचा निर्णय देणं सोपं नव्हतं पण सुप्रीम कोर्टाने प्रत्येक पक्षकाराची बाजू ऐकून घेतली आणि अतिशय अवघड आणि जटील खटल्याचा निकाल दिला. त्यामुळे न्यायव्यवस्था अभिनंदनास पात्र आहे, असं ते म्हणाले. नव्या भारतात कटुतेला थारा नाही, विविधतेतून एकता हा मंत्र पुन्हा एकदा उजळून निघाला आहे, असं सांगत मोदींनी देशवासियांना नवा भारत घडवण्याचं आवाहन केलं. आता नवी सुरुवात करूया, असं ते म्हणाले. पंतप्रधानांच्या भाषणातले प्रमुख मुद्दे - देशानं खुल्या मनानं सुप्रीम कोर्टाचा निर्णय स्वीकारला - भारत ही जगातली सर्वात मोठी लोकशाही असल्याचं सिद्ध झालं. -सुप्रीम कोर्टाने प्रत्येक पक्षकाराची बाजू जाणून घेतली. -सुप्रीम कोर्टानं अतिशय अवघड, जटील निर्णय अखेर घेतला. -न्यायव्यवस्था अभिनंदनास पात्र आहे. - 9 नोव्हेंबर हा ऐतिहासिक दिवस ठरणार आहे -कटुतेला तिलांजली देण्याचा आजचा दिवस आहे. -नव्या भारतात कटुता, भीतीला थारा नाही - आपला विविधतेत एकता हा मंत्र उजळून निघाला. - नवीन सुरुवात करुया, नवा भारत घडवूया. - सलोखा, एकता, शांती. सद्भभाव, स्नेह देशाच्या विकासासाठी मोलाचा. ==========================================================================================
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







