मुंबई, 31 मार्च : भारतीय सैन्य दलांमध्ये पुरुषांप्रमाणेच महिलांचादेखील उल्लेखनीय सहभाग आहे. हा सहभाग आणखी मजबूत करण्यासाठी अग्निवीरांच्या भरती प्रक्रियेमध्ये मुलींनाही संधी देण्यात आली आहे. याच संधीचा लाभ घेऊन छत्तीसगडमधील एका 19 वर्षांच्या मुलीनं सैन्यात भरती होण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे. यासाठी तिच्या वडिलांनी तिला सर्वांत जास्त प्रोत्साहन दिलं होतं. हिशा बघेल असं नाव असलेली ही मुलगी मंगळवारी आयएनएस चिल्का येथे झालेल्या पासिंग आउट परेडमध्ये महिला अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीत सहभागी झाली होती. त्याचवेळी हिशाचं कुटुंब तिच्या स्वप्नांना बळ देणाऱ्या तिच्या वडिलांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करत होतं.
सशस्त्र दलात सामील होण्यासाठी प्रेरणा देणारे वडील आता हयात नाहीत याची हिशाला कल्पनाही नव्हती. तिच्या प्रशिक्षणावर परिणाम होऊ नये म्हणून कुटुंबानं वडिलांच्या मृत्यूबद्दल तिला सांगितलं नाही. 'टाइम्स ऑफ इंडिया'नं या बाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
बैलगाडा शर्यतीत 14 वर्षाच्या शर्मिलाचा नवा विक्रम, ऐकून लोकांनाही वाटलं आश्चर्य
छत्तीसगडची पहिली महिला अग्नीवीरांगना
दुर्ग शहरापासून सुमारे 15 किलोमीटर आणि राज्याची राजधानी रायपूरपासून 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरीगरका गावात हिशा बघेलचं संपूर्ण कुटुंब राहतं. हिशा ही छत्तीसगडमधील पहिली महिला अग्निवीरांगना आहे. निवड झालेल्या सुमारे दोन हजार 600 अग्निवीरांच्या तुकडीत तिचा समावेश आहे. या तुकडीमध्ये हिशासह एकूण 273 मुलींचा समावेश आहे. ज्यांनी 28 मार्च रोजी ओडिशातील आयएनएस चिल्का येथे आपलं प्रारंभिक प्रशिक्षण पूर्ण केलं आणि भारतीय नौदलात सामील झाल्या आहेत.
3 मार्च 2023 रोजी हिशाचे वडील संतोष बघेल यांचं कॅन्सरमुळे निधन झालं. तेव्हा हिशा आपल्या प्रशिक्षणाच्या शेवटच्या टप्प्यात होती. तिच्या कुटुंबानं तिच्यापासून ही दुःखद बातमी लपवून ठेवण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून ती आपल्या प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित करू शकेल. हिशाचे वडील संतोष बघेल आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ऑटोरिक्षा चालवत होते. पण, 2016 मध्ये त्यांना कॅन्सरचं निदान झाल्यानंतर उपचारांसाठी रिक्षा विकावी लागली होती. हिशाच्या मनात सशस्त्र दलांबद्दल आकर्षण होतं. आजारी संतोष यांनी तिच्या आवडीचा आदर केला आणि अग्निवीर योजना सुरू झाल्यानंतर तिला भरती होण्यासाठी प्रोत्साहित केलं.
स्टंटबाजी करणं तरुणीला पडलं महागात, झाडाच्या फांदीला लटकली आणि... पाहा Video
हिशाचा मोठा भाऊ कोमल बघेल यानं टाइम्स ऑफ इंडियाला सांगितलं की, "ती एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात घरी येणार आहे. आम्ही तिला आमच्या वडिलांच्या मृत्युबद्दल अजून सांगितलेलं नाही. आपलं स्वप्न पूर्ण करताना तिचा धीर खचू नये, अशी आमची इच्छा होती. हिशा आणि वडिलांनी एकत्र मिळून हे स्वप्न बघितलं होतं."
"ती एक चांगली अॅथलीट आहे, ज्यामुळे तिला तिचं ध्येय साध्य करण्यात मदत झाली. विशाखापट्टणम येथे झालेल्या अग्निवीर शारीरिक चाचण्यांमध्ये ती प्रथम क्रमांकावर होती," असंही कोमलनं सांगितलं.
"माझे वडील 2016 मध्ये आजारी पडल्यानंतर आमची सर्व बचत त्यांच्या उपचारांसाठी खर्च झाल्यामुळे आम्ही आर्थिक संकटात सापडलो होतो. आमच्या कुटुंबातील ते एकमेव कमावते सदस्य होते. माझे आई-वडील फार शिकलेले नसले तरी त्यांनी आम्हाला अभ्यासासाठी नेहमीच प्रोत्साहन दिलं. आता सर्व विपरित परिस्थीतीचा सामना करत हिशानं आमच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं आहे," असं कोमल म्हणाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chhatisgarh