मुंबई, 28 फेब्रुवारी: चार राज्यं आणि एक केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांचे (Assembly Election 2021) काऊंटडाऊन सुरु झालं आहे. या राज्यांमध्ये कुणाची सत्ता येईल हे 2 मे रोजी निश्चत होईल. प्रत्यक्ष निवडणुकांपूर्वी जनमताचा अंदाज सांगणाऱ्या ओपिनियल पोलचा (Opinion Poll) निष्कर्ष जाहीर झाला आहे. त्यानुसार एका ठिकाणी भाजपा पहिल्यांदाच सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे.
बंगालमध्ये कुणाचं सरकार?
‘ABP- C VOTER’ यांच्या ओपिनियन पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) पुन्हा एकदा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा विजय निश्चित आहे. तृणमुल काँग्रेसला (TMC) 148 ते 164 जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजपाच्या जागांमध्ये वाढ होण्याची शक्यता असली तरी भाजपाला स्पष्ट बहुमतापेक्षा बऱ्याच कमी म्हणजे 92 ते 108 जागांवरच समाधान मानावे लागेल. काँग्रेस-डाव्या आघाडी युतीला 31ते 39 जागा मिळण्याची शक्यता आहे.
'आसाममध्ये पुन्हा कमळ फुलणार'
ओपिनियन पोलनुसार आसाममध्ये (Assam) भाजपाचा विजय निश्चित आहे. भाजपा 68 ते 76 जागा जिंकत राज्यात सलग दुसऱ्यांदा सत्ता स्थापन करु शकते. काँग्रेसला 43 ते 51 जागा मिळू शकतात.
‘केरळमध्ये डाव्यांचं सरकार’
केरळमध्ये (Kerala) पुन्हा एकदा सत्ताधारी डाव्या आघाडीचं (LDF) सरकार येण्याचा अंदाज आहे. एलडीएफला 83 ते 91 जागा मिळतील. तर काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील आघाडीला (UDF) 47 ते 55 जागांवर समाधान मानावे लागेल. केरळमध्ये भाजपाला 2 जागांवरच विजय मिळू शकतो.
‘तामिळनाडूमध्ये बदल होणार’
तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu) डीएमके (DMK) आघाडी सत्तेवर येण्याची शक्यता आहे. या आघाडीला 154 ते 162 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर सत्तारुढ एआयडीएमके (AIDMK) आघाडीला 58 ते 66 जागा मिळू शकतात. अन्य पक्षांना 8 जागा मिळण्याची शक्यता आहे.
(मोदींना घाबरत नाही म्हणून मला 30 सेकंदात झोप लागते मात्र..., राहुल गांधीचं विधान )
'पुदुच्चेरीमध्ये भाजपाची सत्ता'
ओपिनियल पोलच्या अंदाजानुसार यंदा कर्नाटाकानंतर प्रथमच एखाद्या दक्षिण भारतामधील राज्यात भाजपाची स्वबळावर सत्ता येण्याची शक्यता आहे. पुदुच्चेरीमध्ये (Puducherry) 17 ते 21 जागा जिंकून भाजपा सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस आघाडीला 8 ते 12 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.