नवी दिल्ली, 23 एप्रिल : देशात उद्भवलेल्या ऑक्सिजन आणीबाणीच्या (Oxygen Acute Shortage) पार्श्वभूमीवर आता संरक्षण मंत्रालयानं (Defence Ministry) जर्मनीतून (Germany) 23 मोबाइल ऑक्सिजन प्लँट (Oxygen Plants) भारतात आणण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रत्येक प्लँटमध्ये प्रति मिनिट 40 लिटर ऑक्सिजन आणि प्रति तास 2400 लिटर उत्पादन करण्याची क्षमता आहे, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. नवी दिल्ली (New Delhi) आणि महाराष्ट्राच्या (Maharashtra) काही भागात ऑक्सिजनची तीव्र कमतरता निर्माण झाल्यानं हा निर्णय घेण्यात आला असून, देशात सलग दुसर्या दिवशी तीन लाख नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडू नये यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. (वाचा- कौतुकाची थाप! चिमुरड्याचे प्राण वाचवणाऱ्या मयूरला ‘जावा’ तर्फे चकचकीत बाईक ) संरक्षण मंत्रालयाचे मुख्य प्रवक्ते ए. भारतभूषण बाबू म्हणाले की, कोविड-19 रूग्णांवर उपचार करणाऱ्या ‘एएफएमएस’ (AFMS) लष्करी रुग्णालयामध्ये हे ऑक्सिजन प्लँट लावले जातील. दरम्यान, भारतीय हवाई दलानं शुक्रवारी ठिकठिकाणचे रिकामे ऑक्सिजन कंटेनर देशभरातील विविध ऑक्सिजन फिलिंग स्टेशनमध्ये पोचवले. तसंच हवाई दल ऑक्सिजन टँकर आणि कंटेनर व्यतिरिक्त कोची, मुंबई, विशाखापट्टणम आणि बेंगळूरु इथल्या डॉक्टर आणि कर्मचार्यांना दिल्लीतील विविध रूग्णालयात नेण्यासह देशातील विविध भागातील रुग्णालयांना आवश्यक औषधे आणि उपकरणं पोहोचवण्याचे काम करत आहे. हवाई दलानं सी-17, सी-130, आयएल -76 आणि एएन-32 आणि अॅव्हरो ही विमानं यासाठी तैनात केली असून, चिनूक आणि एमआय-17 ही हेलिकॉप्टर्स कोणत्याही क्षणी उड्डाणासाठी सज्ज ठेवली असल्याची माहिती हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. (वाचा- अचानक ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने दोन रुग्णांचा मृत्यू, बीडमधील धक्कादायक घटना ) तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशातील आघाडीच्या ऑक्सिजन उत्पादकांची व्हर्च्युअल बैठक घेतली आणि इतर वायूंच्या वाहतूकीसाठी वापरल्या जाणाऱ्या टँकरचा वापर ऑक्सिजन पुरवठ्यासाठी करण्याची सूचना केली. ही वेळ फक्त आव्हानांना सामोरं जाण्याची नाही तर जलद गतीनं तोडगा काढण्याची आहे, असं त्यांनी या वेळी सांगितलं. सरकार आणि ऑक्सिजन उत्पादक यांच्यातील समन्वय वाढवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक कोविड-19 रुग्ण असलेली 11 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत एक उच्चस्तरीय बैठक घेतली. सर्व राज्यांमधील वैद्यकीय गरजा पूर्ण करण्यासाठी परस्परांशी समन्वय राखावा आणि एकत्रितपणे काम करावं असं त्यांनी सांगितलं. ‘आपण एक राष्ट्र म्हणून काम केले तर स्रोतांची कमतरता भासणार नाही,’ असंही ते म्हणाले. ऑक्सिजन टँकर ज्या ठिकाणी जाणं अपेक्षित आहे तिथं जाताना अडथळे येऊ नयेत किंवा तो दुसरीकडे भरकटला जाऊ नये, याची काळजी प्रत्येक राज्यानं घ्यावी, अशी सूचनाही मोदी यांनी केली. ऑक्सिजन पुरवठ्याला चालना देण्यासाठी केंद्रानं एम्स, एनआयसी झज्जर, सफदरजंग, राम मनोहर लोहिया रुग्णालय यासारख्या शासकीय रुग्णालयांमध्ये तत्काळ डीआरडीओ (DRDO) आणि टाटा सन्स (Tata Sons) यांचा ऑक्सिजन निर्मिती प्लँट उभारण्याचा निर्णय घेतला असून, प्रति मिनिटात एक हजार लिटर ऑक्सिजन तयार करण्याची या प्लँटची क्षमता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी पूर्ण करण्यासाठी उत्पादन उद्योगाच्या पूर्ण क्षमतेनं वापर करण्याचे आवाहन केलं असून, ऑक्सिजन टँकर्सची जलद गतीनं वाहतूक करण्यासाठी रेल्वे आणि हवाई दल तैनात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.