गोपालगंज, 20 एप्रिल : उन्हाळ्यात अग्निशमन विभागाचे (Fire Brigade) अधिकारी विशेष दक्षता घेतात. टोल फ्री क्रमांक 101 वर (Fire toll free number) येणारा प्रत्येक फोन गांभीर्याने घेतला जातो. एकही कॉल मिस होऊ नये, म्हणून कॉल उचलण्यासाठी कर्मचाऱ्यांची ड्युटी लावली जाते. पण, या टोल फ्री क्रमांकावर बनावट कॉल्स येऊ लागल्यामुळे अग्निशमन विभागाचे कर्मचारी चांगलेच वैतागले आहेत. विशेषत: काही मुली टोल फ्री क्रमांकावर फोन करून लग्नाचा प्रस्ताव (marriage proposal) ठेवत आहेत. तर, काही मुली हृदयातील आग विझवण्यासाठी अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून पाण्याची मागणी करत आहेत.
वास्तविक, जाळपोळीच्या घटनांची माहिती घेऊन लोकांना मदत देण्यासाठी तत्पर राहण्यासाठी सुरू केलेल्या टोल फ्री क्रमांकावर बराच वेळ या 'फेक कॉल्स'मध्ये जातो. टोल फ्री क्रमांकाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होत असल्याचं अग्निशमन केंद्रातील कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. दररोज 15 ते 20 मुलींचे फोन येतात. यामध्ये प्रेमाचे प्रस्ताव ठेवणाऱ्या या मुली हृदयाची आग विझवण्यासाठी अग्निशमन केंद्राकडे पाणी मागू लागतात. मोबाइल रिचार्ज आणि लग्नाचे प्रस्तावही नियंत्रण कक्षाच्या कर्मचाऱ्यांना दिले जात आहेत. एप्रिल महिन्यात आगीच्या 27 घटना घडल्या असताना बिहारमधल्या गोपालगंज जिल्ह्यात ही स्थिती आहे.
नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांच्या समस्या
अग्निशमन केंद्राच्या नियंत्रण कक्षाचे कर्मचारी सत्यप्रकाश सिंह यांनी सांगितलं की, या मौसमात आगीच्या बऱ्याच घटना घडतात. यात येणाऱ्या खोट्या फोन कॉल्समुळे ते नाराज आहेत. फोन बराच वेळ व्यस्त असल्याने गरजूंचे अनेकवेळा फोन येत नाहीत. त्यामुळे त्यांना वेळेवर सुविधा मिळत नाही.
हे वाचा - जामा मस्जिदाच्या गेटजवळ पोहोचला बुलडोझर, कारवाईचा Live Video
दोन मोबाईल क्रमांक जारी केले
अग्निशमन विभागाचे अधिकारी उपेंद्र कुमार म्हणतात की, गोपालगंज जिल्हा मुख्यालय अग्निशमन केंद्राचा टोल फ्री क्रमांक 101 जनतेच्या सोयीसाठी जारी करण्यात आला आहे. या क्रमांकावर कोणतीही व्यक्ती आगीची माहिती घेऊन तत्काळ अग्निशमन केंद्रापर्यंत पोहोचू शकते. आता 7485805810 आणि 7485805811 या मोबाईल क्रमांकावरही आगीची माहिती देता येईल. याद्वारे कॉल करणाऱ्याचे नाव आणि पत्ता शोधता येईल. प्रशासनाने अशा बनावट फोन कॉल्सची चौकशी करून ठोस कारवाई करण्याची गरज असल्याचं ते म्हणतात.
हे वाचा - दक्षिण आफ्रिकेत कोरोनानंतर पुराचं थैमान, 40 हजार लोक बेघर, पाहा PHOTOS
भाड्याच्या शेडमध्ये कार्यालय सुरू आहे
आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या व्यवस्थेवर नजर टाकली, तर अग्निशमन विभागाची स्वत:ची इमारत नाही. विस्कोमन भवनच्या शेडमध्ये कार्यालय सुरू आहे. जिल्ह्यात लहान-मोठी अशी एकूण 14 वाहने आहेत. यापैकी 10 छोटी वाहनं पोलीस ठाण्यांच्या ताब्यात देण्यात आली आहेत, जेणेकरून ग्रामीण भागातील आगीवर तातडीने नियंत्रण मिळवता येईल. विभागात कर्मचाऱ्यांचीही कमतरता आहे. एकूण दोन अग्निशमन उपकेंद्र असून, येथे एका अग्निशमन अधिकाऱ्यासह 36 कर्मचारी आहेत. फायरमन, चार हवालदार, मुख्य चालक, दोन विभागीय अधिकारी ही पदे रिक्त आहेत. ग्रामीण भागात होमगार्ड जवानांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याची यंत्रणा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Fire, Fire station, Love, Romance, Water