नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी: मद्यपान (Alcohol Consumption) आणि तंबाखूसेवन (Tobacco Consumption) हे आरोग्यासाठी घातक असतं. मात्र, तरीदेखील अलीकडच्या काळात मद्यपान करण्यांचं प्रमाण लक्षणीय वाढल्याचं दिसतं. फॅशन म्हणून मद्यपान करणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण संस्थेने (National Family Health Survey-NFHS) नुकत्यात केलेल्या एका सर्व्हेतून मद्यपान आणि तंबाखू सेवनाबाबत काही धक्कादायक माहिती पुढे आल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाने ओडिशामध्ये (Odisha) केलेल्या सर्व्हेचा अहवाल नुकताच जारी केला आहे. यात गेल्या पाच वर्षांत मद्यपान आणि तंबाखूसेवन करणाऱ्या महिलांची संख्या वाढली असून पुरुषांची संख्या कमी झाल्याचं दिसून आलं आहे.
शहरी भागातील लोक जास्त दारू पितात असा समज आता काहीसा बदलणार आहे. अर्थात त्यामागे कारणही तितकंच महत्त्वाचं आहे. राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षणाने ओडिशामध्ये केलेल्या सर्व्हेतून गेल्या पाच वर्षांत मद्यपान करणाऱ्या पुरुषांची संख्या कमी झाली असून, महिलांची संख्या वाढल्याचं स्पष्ट झालं आहे. या सर्व्हेच्या अहवालानुसार, 2015-16 मध्ये 15 वर्षांवरील महिलांमध्ये मद्यपानाचं प्रमाण 2.4 टक्के होतं, ते 2020-21 मध्ये वाढून 4.3 टक्क्यांवर पोहोचलं आहे. त्याचवेळी पुरुषांच्या बाबतीत 2015-16 मध्ये हे प्रमाण 39.3 टक्के होतं, ते घटून 28.8 टक्क्यांवर आलं आहे. ओडिशातील ग्रामीण भागात (Rural Area) राहणाऱ्या 15 वर्षांवरील वयोगटातील पुरुष आणि महिला, शहरी भागातील महिला आणि पुरुषांच्या तुलनेत जास्त मद्यपान करत असल्याचं दिसून आलं आहे. सर्व्हेनुसार, 22.7 टक्के शहरी भागातील पुरुषांच्या तुलनेत 30.2 टक्के ग्रामीण पुरूष दारू पित असल्याचं दिसून आलं आहे. टीव्ही9 हिंदीने याबाबत वृत्त दिले आहे.
हे वाचा-काश्मीरच्या या गावात प्रत्येक घरात मुक-बहिरे! लष्कराच्या निर्णयाचा वाटेल अभिमान
केवळ मद्यपानच नाहीतर पुरुषांच्या तुलनेत महिलांचे तंबाखू सेवनाचे प्रमाणही लक्षणीय वाढले आहे. 2015-16 दरम्यान केवळ 17.3 टक्के महिलांना तंबाखू खाण्याचं व्यसन होतं. मात्र ताज्या सर्व्हेनुसार, हा आकडा आता 26 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. शहरी भागातील 16.6 टक्के तर ग्रामीण भागातील 26 टक्के महिला तंबाखू सेवन करतात. तंबाखू खाणाऱ्या पुरुषांचा आकडा 55.9 टक्क्यांवरून घसरत 51.6 टक्के झाला आहे. ग्रामीण भागात हाच आकडा 58.8 टक्क्यांवरून घटत 54.1 टक्क्यांवर आला आहे. शहरी भागातील पुरुषांमधील तंबाखू सेवनाचं प्रमाणही घटलं असून हा आकडा 45.3 टक्क्यांवरून घटत 40.5 टक्के झाला आहे.
अहवालानुसार, शहरी भागात (Urban Area) मद्यपान करणाऱ्या पुरुषांची संख्या 32.2 टक्क्यांवरून घटत 22.7 टक्के झाली आहे. तर मद्यपान करणाऱ्या महिलांच्या बाबतीत ग्रामीण आणि शहरी वाटा अनुक्रमे 4.9 टक्के आणि 1.4 टक्के आहे.
हे वाचा-देशातील सर्वात तरुण महापौर आणि सर्वात तरुण आमदारांचं जुळलं सूत, अडकणार लग्नबेडीत
या अहवालातील विशेष बाब म्हणजे, ग्रामीण महिलांमध्ये (Rural Women) दारू पिण्याचे प्रमाण 2.6 टक्क्यांवरून 4.9 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. तर पुरुषांचे प्रमाण 41.3 टक्क्यांवरून 30.2 टक्क्यांवर आले आहे. दुसरीकडे गेल्या पाच वर्षात शहरी महिलांच्या मद्यपानाच्या आकडेवारीत विशेष बदल झालेला नाही. हा आकडा 1.3 टक्क्यांवरून 1.4 टक्क्यांवर पोहोचला आहे, हा अहवालातील महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Alcohol