आग्रा, 29 जून : मुलगा हा वंशाचा दिवा असतो. त्यामुळे मूल जन्माला येणार असेल, तर तो मुलगाच हवा असं आजही समाजातील काही घटकांना वाटतं. जोवर मुलगा होत नाही, तोपर्यंत मुलांना जन्म देत राहणारे अनेक आई-वडील असतात. आग्र्यामध्ये अशाच प्रकारची एक घटना घडली आहे. रिक्षा चालवणाऱ्या (Auto Driver) एकानं केवळ मुलगा व्हावा म्हणून तीन मुलींनंतर अजून एक चान्स घेतला. इतकंच नाही तर आता त्याच्यावर पश्चात्तापाची वेळ आली आहे. कारण त्याच्या बायकोनं एकाचवेळी चार अपत्यांना (Birth To Four Children) जन्म दिला आहे. त्यापैकी तीन मुली, तर एक मुलगा आहे. पश्चात्तापाची वेळ अशासाठी की आता सात मुलांचं पालनपोषण करण्याची जबाबदारी या कुटुंबावर आली आहे.
सोशल मीडियावर सध्या आग्र्यातील एकाचवेळी जन्मलेल्या चार मुलांची भरपूर चर्चा आहे. आग्र्यामधील एत्माद्दौला येथील प्रकाश नगरमध्ये राहणारे मनोज कुमार हे रिक्षा (Father Is Auto Driver) चालवतात. त्यांना तीन मुली आहेत. काहीच दिवसांपूर्वी त्यांची गरोदर पत्नी खुशबू हिला रामबाग येथील ट्रान्स यमुना कॉलनीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं तिनं एकाचवेळी चार बाळांना जन्म दिला. ही प्रसूती अवघड होती. मात्र आता आई आणि बाळं सुरक्षित आहेत. या चार मुलांपैकी तीन मुली तर एक मुलगा आहे.
मनोज कुमार यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं आता या सात मुलांची जबाबदारी कशी निभावणार अशी चिंता त्यांना लागून राहिली आहे. सध्या रुग्णालयात एका बाळाचा दिवसाचा खर्च 6 हजार रुपये येतो आहे. त्यामुळे चारही अपत्यांसाठी दिवसाला 24 हजार रुपये खर्च होत आहेत. आतापर्यंतचा खर्च मनोज कुमार यांनी उधारी घेऊन भागवला आहे. मात्र अजूनही बाळांना दोन ते तीन दिवस रुग्णालयात ठेवावं लागणार आहे. त्या खर्चाची सोय कशी करायची असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. रुग्णालयाच्या संचालकांनी मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. मात्र सध्या मनोज कुमार यांना पैशांची आवश्यकता आहे. जर कोणी मदत करण्यासाठी इच्छुक असेल, तर त्यांनी मनोज कुमार यांच्याशी 9536628735 या क्रमांकावर संपर्क साधावा.
प्रत्येक मूल आई-वडिलांसाठी खासच असतं. त्यामुळे मुलांच्या पालनपोषणासाठी पडेल ते काम पालक करतात. वेळप्रसंगी स्वतः उपाशी राहून मुलांना घास भरवतात. जन्माला येणाऱ्या बाळाचा काहीच दोष नसतो. मात्र परिस्थितीचे चटके सोसत प्रत्येकाला पुढे जायचं असतं. नव्या पिढीचं भवितव्य उज्ज्वल आणि सुखकर होईल, यासाठी प्रयत्न करणं, हीच समाज म्हणून आपल्या प्रत्येकाची जबाबदारी असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Agra, Father, Small baby