नवी दिल्ली, 8 नोव्हेंबर : अलीकडच्या काळात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. जातपात, अस्पृश्यता आदी कारणांमुळे हत्येसारखे गंभीर गुन्हे घडल्याचं आपण पाहतो. सध्या राजस्थानमधली अशीच एक घटना जोरदार चर्चेत आहे. तिथल्या एका आदिवासी व्यक्तीची अस्पृश्यतेच्या कारणावरून हत्या करण्यात आली आहे. हातपंपावर पाणी भरण्यावरून गुंडांनी या व्यक्तीला बेदम मारहाण केली. यामुळे या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, घटनेचा अधिक तपास सुरू आहे. या घटनेच्या विरोधात भिल्ल समाजाच्या नागरिकांनी तीव्र आंदोलन करून अन्य आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. `आज तक`ने याविषयीचं वृत्त दिलं आहे. राजस्थानमधल्या जोधपूरमध्ये आदिवासी समाजातला 46 वर्षांचे किशनलाल भिल आणि काही युवकांमध्ये पाण्यावरून वाद झाला. या वादातून युवकांनी किशनलाल यांना मारहाण केली. मारहाणीत किशनलाल गंभीर जखमी झाले. यानंतर आरोपींनी जखमी किशनलाल यांना रुग्णालयात नेण्यापासून रोखलं; मात्र नंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला. किशनलाल यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच रात्री उशिरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर किशनलाल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून, तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर अन्य आरोपींचा शोध सुरूआहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या मतदारसंघातल्या सूरसागर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातल्या भोमियाजी खोऱ्यात ही घटना घडली आहे. हेही वाचा - रेल्वेने प्रवास करताय? हे काम कराच, नाहीतर 10 लाखांचं होईल नुकसान घटनेबाबत किशनलाल यांचा भाऊ अशोक भिल यांनी माहिती दिली. ते म्हणाले, `भोमियाजी खोऱ्यातल्या सूरजबेराजवळ एक हातपंप आहे. त्यावर मोटार बसवण्यात आली आहे. ही मोटार शकील नासिर आणि बबलू या दोघांच्या ताब्यात आहे. या व्यक्ती अन्य कोणत्याही समाजाच्या व्यक्तींना या हातपंपावर पाणी भरू देत नाहीत. एखाद्याने पाणी भरण्याचा प्रयत्न केला तर पाइप कापून टाकतात. आम्ही दीर्घ काळपासून या ठिकाणी रात्रीच्या वेळी पाणी भरतो. रविवारी रात्री किशनलाल पाइप घेण्यासाठी गेला असता, त्याला जातिवाचक शिवीगाळ करण्यात आली आणि त्याला तिथून हुसकावून लावण्यात आलं. त्यानंतर आमच्या घरावर हल्ला करण्यात आला. आरोपींनी किशनलाल आणि त्याच्या मुलाला बेदम मारहाण केली. आरोपींनी माझ्या भावाला जबर मारहाण केली. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यापासून रोखलं. पोलीस दाखल होताच भावाला रुग्णालयात नेण्यात आलं; पण दुर्दैवानं रुग्णालयात सकाळी त्याचा मृत्यू झाला.` `किशनलाल यांच्या कुटुंबीयांकडून घटनेची माहिती मिळताच रात्री पोलिसांनी तीन कुख्यात आरोपींना ताब्यात घेतलं असून, अन्य आरोपींचा शोध सुरू आहे,` अशी माहिती पोलीस ठाण्याचे अधिकारी डॉ. गौतम डोटासरा यांनी दिली. दरम्यान, मथुरादास माथुर रुग्णालयाच्या शवागारासमोर भिल्ल समाजाचे नागरिक एकत्र जमले आणि किशनलाल यांच्या शवविच्छेदनावरून वाद निर्माण झाला. या घटनेतल्या अन्य आरोपींना तातडीने अटक करा, या मागणीसाठी भिल्ल समाजाच्या नागरिकांनी शवागारासमोर ठाण मांडलं. त्यामुळे शवविच्छेदनाची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. शवागाराच्या परिसरात पोलीस अधिकारीदेखील उपस्थित आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.