मुंबई, 08 नोव्हेंबर : प्रवास करायला अनेकांना आवडतं. देशांतर्गत ठिकाणं फिरण्यासाठी सर्वांत स्वस्त आणि सोयीचा पर्याय म्हणजे रेल्वेचा. रेल्वेने फिरण्यासाठी फार खर्च येत नाही. तसंच अनेक छोट्या शहरांमध्येही रेल्वे जाते. भारतात सर्वाधिक नागरिक प्रवासासाठी रेल्वेचा वापर करतात; पण या रेल्वेच्या सर्व सुविधांबद्दल तुम्हाला माहिती आहे का? रेल्वेची एक अशी सुविधा आहे, ज्याबद्दल फार जणांना माहिती नाही. रेल्वेने प्रवास करणार असाल, तेव्हा तिकीट बुक करताना इन्शुरन्स नक्की काढा. कारण काही विपरीत प्रसंग घडल्यास इन्शुरन्समुळे तुम्हाला 10 लाख रुपयांपर्यंतची नुकसानभरपाई मिळू शकते. ट्रॅव्हल इन्शुरन्स म्हणजे काय? ऑनलाइन रेल्वे तिकीट बुक करणाऱ्यांना रेल्वे ट्रॅव्हल इन्शुरन्सचा पर्याय उपलब्ध करून देते; पण फार कमी जण तो पर्याय निवडतात. कारण अनेक जण त्याकडे चक्क दुर्लक्ष करतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे 1 रुपयापेक्षा कमी रक्कम खर्च करून प्रवाशाला 10 लाख रुपयांचं संरक्षण मिळतं. तिकीट बुक करताना प्रवास विमा घेतलात आणि ट्रेनचा अपघात झाला किंवा प्रवासादरम्यान दुर्घटना घडली, तर विमा कंपनी भरपाई देते. (Railway Rules : तिकीट नसेल तरी करु शकता रेल्वेने प्रवास; समजून घ्या रेल्वेचा ‘हा’ खास नियम) ट्रॅव्हल इन्शुरन्स कसा काढायचा? रेल्वेचं तिकीट ऑनलाइन बुक करताना वेबसाइट किंवा अॅपवर रेल्वे ट्रॅव्हल इन्शुरन्सचा पर्याय येतो. अनेक जण सहसा याकडे लक्ष देत नाहीत; पण पुढच्या वेळी तिकीट बुक करताना हा पर्याय नक्की निवडा. यासाठी तुम्हाला फार पैसे मोजावे लागणार नाहीत. हा पर्याय निवडल्यावर ई-मेल आयडी आणि मोबाइल नंबरवर एक लिंक येईल. ही लिंक कंपनीकडून येते. ही लिंक उघडून नॉमिनी डिटेल्स भरावेत. कारण नॉमिनी असल्यास विमा पॉलिसीची रक्कम मिळवणं सोपं जातं. क्लेम किती मिळणार इन्शुरन्स असेल आणि रेल्वेचा अपघात झाल्यास विमा कंपनी नुकसानभरपाई देते. प्रवाशाला झालेल्या नुकसानानुसार विम्याची रक्कम दिली जाते. अपघातात प्रवाशाचा मृत्यू झाल्यास 10 लाख रुपयांची विमा रक्कम नॉमिनीला दिली जाते. रेल्वे अपघातात प्रवासी अपंग झाल्यास त्यालाही कंपनीकडून 10 लाख रुपये दिले जातात. आंशिक किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 7.5 लाख रुपये आणि दुखापत झाल्यास 2 लाख रुपयांचा रुग्णालयाचा खर्च कंपनी देते. (प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वेत झोपण्याचा नियम बदलला, आता ही चूक करू नका) नॉमिनीचं नाव आवर्जून टाका रेल्वे अपघाताच्या वेळी जखमी व्यक्ती, नॉमिनी किंवा त्याचा वारसदार विमा कंपनीकडे जाऊन दावा करू शकतात. हा दावा अपघातानंतर 4 महिन्यांच्या आत केला जाऊ शकतो. विमा कंपनीच्या कार्यालयात जाऊन दावा दाखल केला जाऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.