• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • बुलंद शहर हिंसाचार प्रकरणातला आरोपी पंचायत निवडणुकीत विजयी, विधानसभेचीही व्यक्त केली इच्छा

बुलंद शहर हिंसाचार प्रकरणातला आरोपी पंचायत निवडणुकीत विजयी, विधानसभेचीही व्यक्त केली इच्छा

उत्तर प्रदेशच्या बुलंद शहरमध्ये 2018 साली एका जमावाकडून हिंसेचा प्रकार (Mob Violence) घडला होता. त्यात सुबोध सिंह (Subodh Singh) या पोलीस इन्स्पेक्टरसह दोघांचा जीव गेला होता.

 • Share this:
  लखनऊ, 4 मे : उत्तर प्रदेशच्या बुलंद शहरमध्ये 2018 साली एका जमावाकडून हिंसेचा प्रकार (Mob Violence) घडला होता. त्यात सुबोध सिंह (Subodh Singh) या पोलीस इन्स्पेक्टरसह दोघांचा जीव गेला होता. त्या प्रकरणात आरोपी म्हणून अटक झालेला योगेश राज हा त्या वेळचा बजरंग दलाचा (Bajrang Dal) कार्यकर्ता नुकत्याच झालेल्या पंचायत निवडणुकीत निवडून आला आहे. तो सध्या जामिनावर बाहेर आहे. योगेश राज (Yogesh Raj) यांनी वॉर्ड क्रमांक पाचमधून निवडणूक लढवली होती. निर्दोष चौधरी या अपक्ष उमेदवाराला त्यांनी 2150 मतांनी हरवलं आहे. 'यापूर्वी मी अनेक संघटनांसोबत काम केलं आहे; पण शेतकऱ्यांचे प्रश्न, विधवांना पेन्शन अशा अनेक मुद्द्यांसाठी राजकारणात उतरण्याशिवाय पर्याय नसतो. अशी कामं त्याशिवाय तडीला नेता येत नाहीत,'असं योगेश राज यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. सियाना येथे 2018 मध्ये घडलेल्या हिंसाचाराबद्दलही (Siyana Violence) त्यांना विचारण्यात आलं.'सियानामधल्या हिंसाचारात दोघांचा मृत्यू झाला. त्या दोघांच्या कुटुंबीयां प्रति मी सहवेदना व्यक्त करतो; पण तो जमाव जमवण्याच्या प्रकरणातला मी आरोपी आहे. माझ्यावर खुनाचा आरोप नाही,'असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. लोकांची इच्छा असेल आणि पाठिंबा मिळाला, तर राज्यातली आगामी विधानसभा निवडणूकही (Assembly Election) लढण्याची आपली इच्छा असल्याचं त्यांनी सांगितलं. 'भविष्यातही मी निवडणूक लढवणार आहे. लोकांची इच्छा असली,तर विधानसभा निवडणूकही लढवीन. एका वर्षापूर्वीपर्यंत मी बजरंग दलाचा कार्यकर्ता होतो. आता मात्र मी कोणत्याही संघटनेचं काम करत नाही,'असंही योगेश राज यांनी स्पष्ट केलं. सियाना पोलिस स्टेशनचा कार्यभार सांभाळत असलेले इन्स्पेक्टर सुबोध सिंह यांच्यासह 20 वर्षांचा नागरिक सुमित सिंह या दोघांचा तीन डिसेंबर 2018 रोजी झालेल्या हिंसाचारात बळी गेला होता. तो हिंसाचार कथितरीत्या योगेश राज यांनी भडकवला होता. हे ही वाचा-तामिळनाडूमध्ये सेलिब्रिटींचे नेते होण्याचा ट्रेंड संपला का? गोहत्येच्या आरोपांवरून जमावाची माथी भडकली आणि त्यांनी चिंग्रावथी पोलिस नाक्यासह डझनभर वाहनं पेटवून दिली. या प्रकरणी 44 जणांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी सहा जणांना हिंसाचाराला आठ महिने झाल्यानंतर जामिनावर सोडण्यात आलं. योगेश राज यांच्यावर गुन्हा सिद्ध झालेला नसला, तरी समाजविरोधी कार्य करण्याच्या आरोपावरून त्यांना अटक झाली होती. त्यांनाच आता लोकांनी पाठिंबा दिल्याचं या निवडणूक निकालावरून सिद्ध झालं आहे. योगायोगाने त्यांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या उमेदवाराचंनावच'निर्दोष'असं आहे.
  First published: