चेन्नई, 15 फेब्रुवारी : तमिळनाडूच्या (Tamil Nadu) तंजापूरमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. माकडांच्या एका झुंडने घरात घुसून 8 दिवसांच्या दोन जुळ्या नवजात बहिणींना उचलून नेल्याची घटना घडली आहे. त्यानंतर या दोन जुळ्या बहिणींपैकी एकीला माकडांनी नाल्यात फेकल्याने या घटनेत एका नवजात बाळाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. माकडांच्या दहशतीमुळे तेथील लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
तमिळनाडूतील तंजापूरमध्ये राहणाऱ्या भुवनेश्वरी यांनी या संपूर्ण घटनेची माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरात बेडरुमध्ये 8 दिवसांच्या दोन जुळ्या बहिणी झोपल्या होत्या. त्यावेळी कुटुंबियांनी मुलींच्या रडण्याचा आवाज ऐकला आणि बेडरुमध्ये धाव घेतली. कुटुंबियांनी समोर जे दृष्य पाहिलं त्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला.
माकडांची एक झुंड त्यांच्या नवजात बाळांना उचलून घेऊन जात असल्याचं पाहिलं. त्यानंतर तेही माकडांच्या मागे धावू लागले, ओरडू लागले. सर्वांनी घराबाहेर येऊन पाहिलं असता, माकडांनी त्यांच्या दोन्ही मुलींना घराच्या छतावर नेल्याचं दिसलं. त्यानंतर आजूबाजूचे अनेक जण गोळा झाले. अनेकांनी माकडांकडून बाळांना घेण्याचा प्रयत्न केला. परंतु माकडं त्या बाळांना सोडत नव्हती.
त्यानंतर काही वेळाने माकडांनी एका मुलीला छतावरच टाकलं आणि दुसऱ्या मुलीला नाल्यात फेकून पुढे पळू लागले. दरम्यान, छतावर टाकलेल्या मुलीला त्वरित उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता त्या आठ दिवसांच्या नवजात मुलीची परिस्थिती स्थिर आहे. परंतु माकडांनी नाल्यात फेकलेल्या मुलीचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसात हळहळ व्यक्त केली जात असून अशाप्रकारे माकडांच्या उच्छादाने सर्वच जण हैराण आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Baby died, Baby hospitalised, India, Monkey tookover twins, Shocking news, Tamil nadu