हैदराबाद, 23 फेब्रुवारी : वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांकडून (Prisoners) वेगवेगळी कामं करून घेतली जातात. यामध्ये शेती, सुतारकाम, विणकाम अशा विविध प्रकारच्या कामांचा समावेश असतो. कैद्यांनी तयार केलेल्या उत्पादनांची विक्री करून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून कैद्यांना शिक्षा संपल्यावर परत जाताना मेहनताना दिला जातो. अल्प शिक्षा झालेल्या, शिक्षा संपल्यानंतर चांगलं आयुष्य जगू इच्छिणाऱ्या कैद्यांचं पुनर्वसन (Rehabilitation of Prisoners) करण्याच्या उद्देशानं विविध योजनाही सरकारतर्फे राबवल्या जातात. कैद्यांना तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर उपजीविकेचं साधन उपलब्ध व्हावं यासाठी त्यांना व्यावसायिक कौशल्य शिकवली जातात. त्यामुळे ते पुन्हा गुन्हेगारीकडे न वळता सर्वसाधारण आयुष्य जगू शकतात.
टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, तेलंगणामध्ये (Telangana) अशा योजनांचा अतिशय सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. तिथं यंदा कैदयांनी चालवलेल्या पेट्रोल पंपाद्वारे तब्बल 550 कोटींचं उत्पन्न कारागृह विभागाला मिळालं आहे. तेलंगणा कारागृह विभागाची (Telangana Prison Department) यंदाची वार्षिक उलाढाल 600 कोटी रुपये असून, त्यातील 550 कोटी रुपयांचं उत्पन्न वेगवेगळ्या जिल्ह्यांत कैद्यांनी चालवलेल्या पेट्रोल पंपाद्वारे (Petrol Bunks) मिळालं आहे, तर उर्वरीत 50 कोटी रुपयांचं उत्पन्न तुरुंगात तयार अन्य उत्पादनाच्या विक्रीतून मिळालं आहेत.
नुकतंच जानगाव इथे कारागृह विभागाच्या 25 व्या ‘माय नेशन’ इंधन विक्री केंद्राचं (My Nation Fuel Centre) उद्घाटन कारागृह विभागाचे महासंचालक राजीव त्रिवेदी (Rajeev Trivedi) यांच्या हस्तं झालं. त्या वेळी बोलताना ते म्हणाले की, तुरुंगातून शिक्षा भोगून बाहेर पडलेल्या कैद्यांचं पुनर्वसन करणं हे कारागृह विभागाचं उद्दिष्ट आहे. शिक्षेचा कालावधी संपल्यानंतर कैद्यांची सुटका होते तेव्हा त्यांना बाहेरच्या जगात नोकरी मिळणं कठीण असतं, अशावेळी ते पुन्हा गुन्हेगारी विश्वात ढकलले जाऊ शकतात, हे आम्हाला रोखायचं आहे. यासाठी आम्ही त्यांना उपजीविकेसाठी साधनं निर्माण करून देतो. त्या दृष्टीनेच कारागृह विभागाने पेट्रोल पंप सुरू केले आहेत. कैद्यांना तिथं काम दिलं जातं, त्यातून त्यांना चांगलं आर्थिक उत्पन्न मिळतं आणि ते सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे सन्मानाचं आयुष्य जगू शकतात. गेल्या वर्षी चेरलापल्ली येथील मध्यवर्ती तुरुंगात मोठ्या प्रमाणात हँडवॉश, हँड सॅनिटायझर्स, मास्क आणि इतर साहित्य तयार करण्यात आलं आणि त्याची विक्री करण्यात आली. त्यातूनही मोठं उत्पन्न मिळालं.’
‘जानगाव जिल्हा प्रशासनाने कारागृह विभागाला पेट्रोलपंप उघडण्यासाठी राष्ट्रीय महामार्गालगत (Highway) जमीन दिली. अन्य जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी अशी जमीन देण्याच्या कारागृह विभागाच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद द्यावा,’ असं आवाहनही राजीव त्रिवेदी यांनी या वेळी केलं.