मुंबई 28 फेब्रुवारी : मुस्लीम धर्मीयांमध्ये हज यात्रेला फार महत्त्व आहे. सौदी अरेबिया देशातील मक्का या शहरामध्ये ही यात्रा भरते. त्या ठिकाणी जगभरातील मुस्लीम एकत्र होतात. शक्य असल्यास प्रत्येक मुस्लिम व्यक्तीनं आयुष्यात एकदा तरी ही यात्रा करावी अशी मुस्लिमांची मान्यता आहे. पूर्वी या यात्रेसाठी भारतातील यात्रेकरू समुद्र मार्गाने जात असत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून समुद्र मार्ग बंद करण्यात आला असून, आता यात्रेकरूंना हजला जाण्यासाठी हवाई मार्गाचा उपयोग करावा लागत आहे. बंद झालेला समुद्र मार्ग पुन्हा सुरू केला जावा, यासाठी मुंबईतील चार मुस्लीम व्यक्तींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं आहे. माहीम येथील रहिवासी - फारूख ढाला, सय्यद एम. इस्माईल, सय्यद गुलजार राणा आणि इरफान माचीवाला यांनी पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) आणि महाराष्ट्र सरकारला पत्र लिहिलं आहे. हज यात्रेकरूंसाठी मुंबई ते जेद्दाह हज आणि उमराह जहाज सेवा सुरू करण्याची मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. या वर्षी 31 जानेवारी रोजी ई-मेल आणि स्पीड पोस्टाद्वारे पाठवलेलं हे पत्र आपल्याला 9 फेब्रुवारी रोजी मिळाल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. ‘मिड डे’नं या बाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. मोठी बातमी! केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेत काहीच गैर नाही; दिल्ली हायकोर्टानं फेटाळल्या सर्व याचिका इरफान माचीवाला म्हणाले, “जहाज सेवा सुरू झाल्यास जेद्दाहला जाण्यासाठी यात्रेकरूंना फ्लाईटच्या तुलनेत खूपच कमी पैसे द्यावे लागतील. त्यामुळे एकूण खर्च कमी होईल. सध्या फ्लाईटच्या एका फेरीसाठी सुमारे 62 हजार रुपये खर्च येतो. रमजानमध्ये याच फेरीसाठी 80 हजार ते एक लाख 25 हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. मागणी आणि पुरवठ्याच्या गुणोत्तरानुसार खर्चाची आकडेवारी बदलते. फ्लाईट्स, निवास इत्यादींचा समावेश असलेली सध्या उपलब्ध असलेली हज पॅकेजेस प्रति व्यक्ती तीन लाख ते सहा लाख रुपयांच्या दरम्यान आहेत. त्यामुळे अनेकांना हजला जाता येत नाही. या पूर्वी केलेल्या शेवटच्या आकडेवारीनुसार, जल वाहतूक अधिक किफायतशीर ठरू शकते. जहाजाच्या तिकिटांची किंमत हवाई भाड्यापेक्षा 50 टक्के कमी असू शकते. त्यामुळे यात्रेच्या एकूण खर्चात फरक पडेल.” पंतप्रधानांना पत्र लिहिणाऱ्या चार गृहस्थांनी आठवण करून दिली की, जेद्दाहला जाण्यासाठी जल वाहतूक हा काही नवीन पर्याय नाही. पूर्वी जल वाहतूक होत होती. ती आता फक्त पुनरुज्जीवित करणं गरजेचं आहे. 1995 मध्ये एमव्ही अकबरी हे हज यात्रेकरूंना नेण्यासाठी वापरलं गेलेलं शेवटचं जहाज होतं. त्या वेळी जहाजातून हजला जाण्यासाठी जवळपास एक आठवडा लागला होता. आता प्रगत तंत्रज्ञानामुळे जहाजांमध्ये बरीच सुधारणा झाली आहे. त्यामुळे आता जहाजातून हजला जाण्यासाठी फक्त तीन दिवस लागतील." रिक्षातला प्रवास अन् सुचली कल्पना, तिघांनी बनवलं वेळ वाचवणारं अॅप, मिळाले तब्बल 67 लाख रुपये या चौघांनी लिहिलेल्या पत्रात असंही म्हटलं आहे की, “2018 मध्ये भारताचे अल्पसंख्याक आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी, एक पायलट प्रोजेक्ट म्हणून मुंबई ते जेद्दाह जहाज सेवा सुरू करण्याबाबत चर्चा करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली होती. भारताच्या या प्रकल्पाला सौदी अधिकारीही सहकार्य करत होते. पण, त्यानंतर या प्रकल्पाकडे कानाडोळा करण्यात आला. नवीन हज पॉलिसीचा भाग म्हणून, मोदी सरकारनं 2018 पासून यात्रेकरूंसाठी 15 क्रूझ ट्रिपची योजना आखली होती. जागतिक दर्जाची जहाजं मुंबई आणि जेद्दाह दरम्यान यात्रेकरूंची वाहतूक करतील आणि प्रत्येक फेरीमध्ये सुमारे पाच हजार यात्रेकरू प्रवास करतील, अशी योजना होती. नवीन हज पॉलिसीचा भाग म्हणून सागरी मार्गाचे पुनरुज्जीवन करण्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात मात्र, त्याबाबत काहीही कार्यवाही झाली नाही.” इरफान माचीवाला यांनी असंही सांगितलं की, “जहाजानं प्रवास करण्याची परवानगी दिल्यास नमाजसाठी (प्रार्थनेसाठी) देखील आदर्श जागा मिळेल शिवाय प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेत कम्युनिटी बाँडिंग चांगली होईल. जलवाहतूक सुरू होईल अशी आज आम्ही अपेक्षा करत आहोत.” या चौघांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेण्याचीही इच्छा व्यक्त केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.