ओडिसा, 5 फेब्रुवारी : ओडिसामध्ये एक 3 वर्षीय मुलगी एका विचित्र आजाराशी झगडते आहे. तिचे वडील देखील आपल्या मुलीला या आजारातून सुटका मिळावी त्याकरता प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. आपल्या मुलीला सृदृढ जीवन जगता यावं याकरता या चिमुकलीचे वडील मदतीची अपेक्षा करत आहेत. या चिमुरडीला असा आजार झाला आहे की ती आपल्या दोन्ही हातांनी कोणतच काम करू शकत नाही आहे. तिच्या हाताच्या बोटांची सतत वाढ होत आहे. त्याचप्रमाणे तिच्या दोन्ही हाताची बोटं एकमेकांना चिकटू लागल्यामुळे तिला एका गंभीर समस्येला सामोरं जावं लागत आहे. या मुलीची हाताची 2 बोटं एकमेकांना चिकटली आहेत तर 3 बोटं अधिक वाढू लागली आहेत. या मुलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्या जन्मानंतर काही महिन्यातच तिची बोटं काहीशी विचित्रपणे वाढत होती, मात्र त्यावेळी तिच्या पालकांनी याकडे दुर्लक्ष केलं. ती जेव्हा दीड वर्षांची होती त्यावेळी पहिल्यांदा पालकांनी तिला डॉक्टरांना दाखवलं. त्यावेळी या आजाराबाबत माहित झालं. (हेही वाचा : दिवसातून तुम्ही किती वेळा खाता, पाहा तुमच्या खाण्याच्या वेळा योग्य आहेत का? ) मुलीच्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे या चिमुरडीच्या आजारावर इलाज करण्यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले. अनेक डॉक्टरांना दाखवून पाहिलं. मात्र कोणताच उपाय तिचा आजार बरा करणारा ठरला नाही. यामध्ये त्यांचा खूप पैसा देखील खर्च झाला मात्र सारे उपाय फोल ठरले. त्यातच गरिबीमुळे आपल्याला या रोगावरील इलाज परवडत नसल्याचंही ते म्हणाले. त्यामुळे या मुलीच्या वडिलांनी सरकारकडून मदतीची अपेक्षा केली आहे. ओडिसातील टिटीलागढच्या उपविभागीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विचित्र आजाराने ग्रस्त मुलीच्या वडिलांना योग्य उपाय करण्याचा दिलासा दिला आहे. शस्त्रक्रिया करून हा आजार बरा होऊ शकतो अशी माहिती त्यांनी दिली आहे. बलांगिरमध्ये असणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयात ही शस्त्रक्रिया करण्यात येईल. त्याचप्रमाणे आर्थिक परिस्थितीशी झगडणाऱ्या या कुटुंबाला त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.