लखनऊ, 15 मे : उत्तर प्रदेशातील लखनऊ
(Lucknow) येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 13 वर्षीय मुलाने एक वर्षाच्या निष्पाप मुलीची हत्या
(1 year baby murder) केली आहे. ही घटना लखनऊच्या सैरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. यानंतर या मुलाला अटक करण्यात आली आहे. सध्या त्याची चौकशी सुरू असून लवकरच त्याला बाल न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
वडिलांच्या अपमानाचा बदला घ्यायचा होता -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 वर्षीया मुलाला आपल्या वडिलांच्या अपमानाचा बदला घ्यायचा होता. त्यामुळे त्याने मुलीची हत्या केली. तिला शाळेतील पाण्याच्या टाकीत टाकले. इतकेच नव्हे तर मुलीचा मृतदेह वर येऊ नये म्हणून आरोपी मुलाने तिच्या पायाला वीट बांधली होती.
सैरपूर पोलीस ठाणे हद्दीतील जुगौर गावात सुशील पांडे यांची 1 वर्षाची मुलगी घरातून बेपत्ता झाली होती. त्यानंतर सुशील यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलीस तपासादरम्यान दोन अल्पवयीन मुले चिमुकलीला शाळेच्या दिशेने घेऊन गेल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी शाळेत झडती घेतली असता शौचालयातील पाण्याच्या टाकीत मुलीचा मृतदेह पडलेला आढळला. मुलीचा पाय विटेने बांधलेला होता, तर तिच्या अंगावर कपडे नव्हते.
यानंतर पोलिसांनी पाण्याच्या टाकीतून मृतदेह बाहेर काढला. तसेच शवविच्छेदनासाठी पाठवला आणि संपूर्ण प्रकरणाचा तासभर तपास केल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला. त्यात अशी माहिती समोर आली की, एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलाने या निष्पाप मुलीची हत्या केली.
हेही वाचा - ठाणे : मावशीची हत्या करून पुरावेही केले नष्ट; पावणेचार वर्षांनी महिलेला मिळाली मोठी शिक्षा
आरोपी ड्रग्जच्या आहारी -
उत्तर विभागाचे डीसीपी एस चिनप्पा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खून करणारा अल्पवयीन मुलगा ड्रग्जच्या आहारी गेलेला आहे आणि तो अनेकदा लोकांना त्रास देत असतो. त्याच्या कुटुंबीयांकडेही अनेकदा तक्रारी केल्या आहेत. वडिलांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आरोपी अल्पवयीन मुलाने मुलीची हत्या केली. सध्या त्याची चौकशी सुरू असून लवकरच त्याला बाल न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.